नागपूरकरांच्या प्रेमाने मुख्यमंत्री फडणवीस भारावले; स्वागत रॅली नव्हे जणू काही शोभायात्राच

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2024 05:57 IST2024-12-16T05:57:00+5:302024-12-16T05:57:42+5:30

रॅलीत भाजप आमदारांची उपस्थिती

cm devendra fadnavis overwhelmed by the love of nagpur people it was more like a procession than a welcome rally | नागपूरकरांच्या प्रेमाने मुख्यमंत्री फडणवीस भारावले; स्वागत रॅली नव्हे जणू काही शोभायात्राच

नागपूरकरांच्या प्रेमाने मुख्यमंत्री फडणवीस भारावले; स्वागत रॅली नव्हे जणू काही शोभायात्राच

लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : ‘मी पुन्हा येईन...पुन्हा येईन...’ ची २०१९ मध्ये केलेली घोषणा, २०२४ मध्ये देवेंद्र फडणवीसांनी पूर्णत्वास आणली. राज्याच्या राजकारणात भाजपला भरघोस यश मिळवून देत तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाचा बहुमान मिळविला. फडणवीस मुख्यमंत्री बनल्याने नागपूरचाही मान वाढला. त्यामुळे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच त्यांचे नागपुरात आगमन होताच नागपूरकरांनी जल्लोषात त्यांचा स्वागत, सन्मान केला. स्वागत रॅलीत नागपूरकरांचा उत्साह बघून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भारावले आणि आपल्या फेसबुक पेजवर त्यांनी ‘नतमस्तक नागपूर’ असा मॅसेज टाकून नागपूरकरांचे आभार मानले.

फडणवीसांच्या स्वागत रॅलीसाठी  विमानतळ ते लक्ष्मीभवन चौकादरम्यानचा माहोल बघण्यासारखा होता. त्यांच्या स्वागतासाठी रस्ते रांगोळ्यांनी सजले होते. कमळाच्या फुलांचे तोरण रॅलीच्या मार्गावर लावले होते. ‘देवाभाऊ’च्या स्वागतासाठी हजारो बॅनर ठिकठिकाणी स्वागत कमानींनी नागपूर सजले होते. फडणवीस विमानतळावरून बाहेर येताच नागपूर शहर व जिल्ह्यातील भाजप व शिवसेनेचे आमदार, भाजपचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी स्वागत केले. विमानतळावरील डॉ. बाबासाहेबांच्या पुतळ्याला माल्यार्पण केल्यानंतर फडणवीसांच्या रॅलीला सुरुवात झाली.  

लक्ष्मीभवन चौकात स्वागत रॅलीचा समारोप झाला. ही स्वागत रॅली जणू शोभायात्रेसारखीच भासली.  रॅलीत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे,  जिल्हाध्यक्ष सुधाकर कोहळे, आमदार कृष्णा खोपडे, आशिष देशमुख, परिणय फुके, मोहन मते, चरणसिंग ठाकूर, ॲड. आशिष जयस्वाल, डॉ. राजीव पोतदार, संदीप जोशी, बंटी कुकडे आदी सहभागी होते.

गडकरींची गळाभेट

महाराष्ट्राच्या राजकारणातील भाजपचा शीर्षस्थ नेता, म्हणून फडणवीसांचा मान असला तरी, गडकरींच्या तालमीत तयार झालेला देवेंद्र अजूनही गडकरींचा मान अदबीने राखतो, याचा प्रत्यय वेळोवेळी बघायला मिळतो. त्यामुळेच नितीन गडकरी राजकारणात ज्येष्ठ असले, तरी देवेंद्र फडणवीसांच्या पाठीशी वेळोवेळी उभे राहतानाही बघितले आहे. यंदाचा विजय तर देवेंद्र फडणवीसांचा ग्रॅण्डव्हिक्ट्री असल्याने अख्खे शहर त्यांच्या स्वागतासाठी रस्त्यावर आले असताना, नितीन गडकरी यांनीही आपल्या जनता दरबारातून वेळ काढून जयप्रकाशनगर चौकात स्वत: उभे राहून फडणवीसांचे स्वागत केले. यावेळी फडणवीसांनी त्यांचे आशीर्वाद घेत त्यांना आलिंगन दिले.

तुमच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही

हा विजय लाडक्या बहिणी, शेतकरी, युवक, गोरगरीब, अठरापगड जातीतील लोकांनी आमच्यावर दाखविलेला विश्वास आहे. हा विजय कधीच आमच्या डोक्यात जाणार नाही, आमचे पाय जमिनीवर राहतील, मी सत्तेत आपली सेवा करण्याकरिता आलो आहे, 

सामान्य माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन करण्यासाठी आलो आहे, तुमच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, असा विश्वास देत फडणवीसांनी रॅलीच्या समारोपीय भाषणातून सर्वांचे आभार मानले.

आपुलकी अन् जिव्हाळा

मुख्यमंत्र्यांच्या स्वागताचे कुणाला निमंत्रण नव्हते, गर्दी जमविण्यासाठी वाहनांची व्यवस्था नव्हती, स्वयंस्फूर्तीने लोकं पुढे आली होती. हातात पुष्पगुच्छ, हार, भाजपचा ध्वज घेऊन रस्त्याच्या दुतर्फा स्वागतासाठी सज्ज होते. ज्येष्ठ नागरिक, गृहिणी, युवकांनी रस्त्यावर गर्दी केली होती.  गर्दीमुळे अनेकांचे हार, फुले देवेंद्र फडणवीसांपर्यंत पोहोचू शकले नाहीत. मात्र, त्याबद्दल कुठलीही खंत न बाळगता, फडणवीसांनी त्यांच्याकडे डोळेभरून पाहिल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर झळकताना दिसला. डॉ.बाबासाहेब आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सुरू झालेल्या स्वागत रॅलीला लक्ष्मीभुवन चौक गाठताना तब्बल अडीच तास लागले. 

 

Web Title: cm devendra fadnavis overwhelmed by the love of nagpur people it was more like a procession than a welcome rally

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.