"शिंदे सेनेचे आमदार घेऊन काय करायचं?"; २२ आमदारांच्या आदित्य ठाकरेंच्या दाव्यावर CM फडणवीसांचा पलटवार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2025 17:28 IST2025-12-08T17:22:25+5:302025-12-08T17:28:47+5:30
फूट पाडण्याच्या आदित्य ठाकरेंच्या दाव्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पलटवार केला आहे.

"शिंदे सेनेचे आमदार घेऊन काय करायचं?"; २२ आमदारांच्या आदित्य ठाकरेंच्या दाव्यावर CM फडणवीसांचा पलटवार
CM Devendra Fadnavis On Aaditya Thackeray: राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाची आजपासून नागपूरमध्ये सुरुवात झाली असून, पहिल्याच दिवशी विरोधी पक्षांनी अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीच्या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांना घेरण्याची तयारी दर्शवली असताना, आदित्य ठाकरे यांच्या एका वक्तव्याने खळबळ उडाली आहे. एकनाथ शिंदे गटाचे २२ आमदार भाजपच्या वाटेवर आहेत, असा सनसनाटी दावा आदित्य ठाकरे यांनी केला. त्यांच्या या 'राजकीय बॉम्ब'वर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार पलटवार करत महायुतीतील संबंधांवर स्पष्ट भाष्य केले आहे.
नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या ठिकाणी पत्रकारांशी बोलताना आदित्य ठाकरे यांनी सत्ताधारी युतीवर गंभीर आरोप केले. सत्ताधारी एका पक्षात दोन गट पडले असून, त्यापैकी २२ आमदार मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यावर नाचत असल्याचा दावा त्यांनी केला. गेल्या वर्षभरातील कामांचा अभ्यास केल्यास या आमदारांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट झाली आहे. त्यांना हवा असलेला निधीही तात्काळ मिळाला आहे. उठ सांगितले तर उठायचे आणि उडी मार बोलल्यावर उडी मारायची, अशा पद्धतीने हे आमदार मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यांवर नाचू लागले आहेत, असे म्हणत आदित्य ठाकरे यांनी या २२ आमदारांमध्ये अंतर्गत वाद असल्याचे सूचित केले. या २२ आमदारांपैकी एक जण स्वतःला 'व्हाईस कॅप्टन' म्हणवतो, असा उपरोधिक टोलाही त्यांनी लगावला.
"ते आमचेच आहेत, घेऊन काय करायचं?"
आदित्य ठाकरेंच्या या सनसनाटी आरोपावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत स्पष्ट आणि थेट उत्तर देत सर्व चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला. "उद्या कोणीही म्हणू शकेल की आदित्य ठाकरेंचे २० आमदार आहेत तेही भाजपच्या गळाला लागले आहेत. कुणाच्या म्हणण्याने थोडी काही होतं. आम्हाला शिंदे सेनेचे आमदार आमच्याकडे घेऊन काय करायचं आहे? ते आमचेच आहेत. शिंदे सेना आमचा मित्रपक्ष आहे आणि ती खरी शिवसेना आहे. त्यामुळे आमच्या मित्रपक्षाचे आमदार घेऊन आम्हाला काय करायचं. आम्ही अशा प्रकारचे राजकारण करत नाही. उलट शिवसेना मजबूत झाली पाहिजे याच्यासाठी आम्ही त्यांच्या पाठीशी उभे आहोत. भविष्यात शिवसेना, भाजप आणि आमची महायुती अजून मजबूत होताना आपल्याला पाहायला मिळेल," असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
आदित्य ठाकरे रोज काँग्रेसच्या गळ्यात गळे टाकून फिरतात
"वंदे मातरमवर कधीही बंदी घालण्यात आली नाही. वंदे मातरमवर जे काही आघात झाले त्यासाठी काँग्रेस जबाबदार आहे. काँग्रेसनेच प्रस्ताव आणून वंदे मातरमचे तुकडे केले आणि अर्धच वंदे मातरम गायलं जाईल असं सांगितले. त्याच काँग्रेसच्या गळ्यात गळे टाकून रोज आदित्य ठाकरे फिरतात. त्यांनी भाजपला नाही तर काँग्रेसला प्रश्न विचारला पाहिजे. भाजपच्या काळात वंदे मातरमचा फक्त सन्मानच केला गेला," असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.