न झालेल्या अपहरणामुळे सिनेस्टाईल गोंधळ; शहर पोलिस यंत्रणेची उडाली तारांबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2025 13:00 IST2025-05-15T12:59:07+5:302025-05-15T13:00:22+5:30
Nagpur : पतीच्या छळाला कंटाळून महिलेने कारने गाठले नागपूर

Cinestyle chaos due to failed kidnapping; City police system in disarray
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : छत्तीसगडमधील डोंगरगड येथून एका पाच वर्षीय मुलीचे कारने अपहरण झाल्याची सूचना आल्यामुळे नागपूर पोलिस अलर्टवर आले व विविध ठिकाणी नाकाबंदी लावत युद्धपातळीवर शोध सुरू झाला. पोलिसांनी नेटवर्कचा वापर करत सक्करदऱ्यातून संबंधित कारला ताब्यातदेखील घेतले. मात्र, कारमध्ये चालकासोबत एक महिला आढळून आली व ज्या मुलीच्या अपहरणावरून तारांबळ उडाली होती ती तिचीच मुलगी असल्याची माहिती समोर आली. आश्चर्याची बाब म्हणजे ती मुलगी छत्तीसगडमध्येच आजीकडे सुखरूप होती. एखाद्या चित्रपटाला शोभेल असा हा प्रसंग मंगळवारी नागपुरात घडला व न झालेल्या अपहरणामुळे पोलिस यंत्रणेची चांगलीच दमछाक झाली.
१३ मे दुपारी एक वाजता नागपूर पोलिस नियंत्रण कक्षाला याबाबत माहिती मिळाली होती. अपहरणकर्ते डोंगरगडमधील पाच वर्षीय मुलीला पांढऱ्या रंगाच्या कारमधून घेऊन निघाले असून त्यांनी देवरी सीमेवरील बॅरिकेट्स उडविले असल्याचे सांगण्यात आले. सीजी-०४ सिरीजची कार असल्याने पोलिसांनी नाकाबंदी लावली. सहायक पोलिस आयुक्त नरेंद्र हिवरे यांना ती कार नंदनवन, सक्करदरा परिसरात फिरत असल्याची माहिती मिळाली.
पोलिसांनी गाडी अडविली व त्यात एक चालक व ३१ वर्षे वयाची महिला होती. तिला मुलीबाबत विचारणा केली असता तिने तिलाच ११ व पाच वर्षांच्या दोन मुली असल्याचे सांगितले. महिलेचे १३ वर्षांअगोदर नागपुरात मोबाइल रिपेअरिंग करणाऱ्या व्यक्तीसोबत लग्न झाले होते. मात्र, पतीशी पटत नसल्याने ती महिन्याभराअगोदर मुलींना घेऊन डोंगरगड येथे माहेरी निघून गेली होती. मात्र, माहेरीदेखील पटत नसल्याने तिने नागपुरातील एका परिचित चालकाला फोन करून डोंगरगडला बोलविले व तेथील लोकांची नजर चुकवून नागपूरकडे निघाली. माहेरच्या लोकांना ती दिसली असता त्यांनी दुसऱ्या कारने तिचा पाठलाग सुरू केला. त्यामुळे देवरी सीमेवर बॅरिकेट्स तोडून कार समोर निघाली. तिने तिच्या दोन्ही मुली डोंगरगडला आजीकडेच असल्याचे स्पष्ट केले. हिवरे यांनी डोंगरगड येथील पोलिस निरीक्षकांना विचारणा केली असता मुली आजीकडेच असल्याची खात्री झाली. डोंगरगडमध्ये कुठल्याही अपहरणाची नोंद नव्हती. महिलेच्या नातेवाइकांनी देवरी सीमेवर अपहरणाचा कांगावा केला होता व त्यातून हा सगळा गोंधळ निर्माण झाला. हा खरा प्रकार समोर आल्यावर नागपुरातील पोलिस यंत्रणेने सुटकेचा निःश्वास सोडला. सहायक पोलिस आयुक्त नरेंद्र हिवरे यांच्यासोबत वरिष्ठ पोलिस निरीक्षक मुकुंद ठाकरे, प्रवीण वाकळे, शेरकर यांच्या पथकाने त्या कारचा शोध घेतला.