बाल मजुरांच्या तस्करीचे रॅकेट : बाल संरक्षण विभागाचा छापा; मुलीसह तिघांची मुक्तता

By नरेश डोंगरे | Updated: January 23, 2025 16:11 IST2025-01-23T16:10:45+5:302025-01-23T16:11:32+5:30

Nagpur : नऊ वर्षाच्या मुलाकडून करून घेतले जात होते पहाटेपासून काम

Child labor trafficking racket: Child Protection Department raids; Three including girl freed | बाल मजुरांच्या तस्करीचे रॅकेट : बाल संरक्षण विभागाचा छापा; मुलीसह तिघांची मुक्तता

Child labor trafficking racket: Child Protection Department raids; Three including girl freed

नरेश डोंगरे - नागपूर 
लोकमत न्यूज नेटवर्क 

नागपूर : अल्पवयीन मुला मुलींची तस्करी करून त्यांना नागपूर शहर आणि अन्य गावात कामाला जुंपले जात असल्याचे पुन्हा एक संताप जनक प्रकरण उघडकीस आले आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी छापा घालून एक मुलगी तसेच दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.
 
परप्रांतातील अल्पवयीन मुलांची तस्करी करून त्यांना नागपुरात आणले जाते आणि त्यांच्याकडून जोर जबरदस्तीने वेगवेगळ्या ठिकाणी काम करून घेतले जात असल्याचा धक्कादायक खुलासा लोकमतने एका वृत्त मालिकेतून १५, १६ आणि १७ जानेवारी २०२४ ला केला होता. त्याची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली. परिणामी खडबडून जागे झालेल्या कामगार आयुक्त कार्यालय तसेच अन्य संबंधित विभागाने ठिकठिकाणी कारवाईची तयारी चालवली आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी २२ जानेवारीला खापरखेडा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कामठी वारेगाव मार्गावर एका वीट भट्टीवर जिल्हा बाल संरक्षण विभागाच्या पथकाने छापा घातला. येथे एका मुलीसह तीन अल्पवयीन बालके काम करीत असल्याचे दिसून आले. त्यांना ताब्यात घेऊन त्यांची बालसुधार गृहात रवानगी करण्यात आली.
 

नऊ वर्षाच्या मुलाकडून पहाटेपासून काम
या छाप्यात धोकादायक ठिकाणी काम करताना आढळलेल्या तिघांपैकी मुलीचे वय १४, दुसऱ्या एका मुलाचे वय १४ वर्षे तर तिसऱ्या एका बालकाचे वय केवळ ९ वर्ष आहे.  पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत या तिघांकडून तेथे अवजड तसेच धोकादायक मशीनवर काम करवून घेतले जात होते. 
 

यांनी केली कारवाई 
जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी रणजीत कुऱ्हे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा बाल संरक्षण अधिकारी मुस्ताक पठाण, साधना हटवार, समन्वयक प्रसन्नजीत गायकवाड तसेच ग्रामीण समस्या मुक्ती ट्रस्टच्या शायना शेख आणि प्रियंका बागडे यांनी ही कारवाई केली.

मोहबे विरूद्ध गुन्हा 
याप्रकरणी जगदीश मोहबे (राहणार कामठी) याच्याविरुद्ध भारतीय न्यायसंहिता कलम १४३, १४६ तसेच बालकामगार कायदा कलम ३ बाल न्याय अधिनियम कलम ७५, ७९ नुसार खापरखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 

Web Title: Child labor trafficking racket: Child Protection Department raids; Three including girl freed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :nagpurनागपूर