चिकुनगुनियाच्या रुग्णांत ६४ टक्क्यांनी वाढ; नागरिकांनी अधिक काळजी घेण्याची गरज
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2025 11:18 IST2025-01-07T11:17:13+5:302025-01-07T11:18:46+5:30
राज्यातील स्थिती : मलेरियाच्या 'पीएफ' प्रकारानेही वाढवली चिंता

Chikungunya patients increase by 64 percent; Citizens need to be more careful
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: राज्यात गतवर्षी नोंद झालेल्या कीटकजन्य आजाराच्या रुग्णसंख्येने आरोग्य विभागाची चिंता वाढवली आहे. चिकुनगुनिया व मलेरियाच्या प्रकोपाने रुग्ण हवालदिल झाले होते. माहिती अधिकारात मिळालेल्या माहितीनुसार, २०२३ च्या तुलनेत २०२४ मध्ये चिकुनगुनियाच्या रुग्णसंख्येत ६४ टक्क्याने, तर मलेरियाच्या 'प्लासमोडियम फेल्किपेराम (पीएफ) या घातक प्रकारात ४३.७४ टक्क्याने वाढ झाल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे यावर्षी अधिक काळजी घेण्याची गरज असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
नागपुरात चिकुनगुनियाचा उद्रेक २००६ मध्ये झाला. परंतु त्यावेळी याची तीव्रता कमी होती. तब्बल १८ वर्षांनंतर या आजाराच्या रुग्णांत मोठी वाढ झाली. स्नायू व सांधेदुखी सोबतच चेहरा काळवंडणे, जांघेत, खाकेत अल्सरमुळे रुग्ण त्रस्त झाले होते. माहिती अधिकारात अभय कोलारकर यांना मिळालेल्या माहितीनुसार राज्यात चिकुनगुनियाचे २०२२ मध्ये १४ हजार ७८५ संशयित रुग्ण आढळून आले होते.
यातील १ हजार ८७ रुग्ण पॉझिटिव्ह आले. २०२३ मध्ये ३१ हजार १८१ संशयित रुग्णांमध्यून १ हजार ७०२ रुग्ण पॉझिटिव्ह आले तर, २८ ऑक्टोबर २०२४ पर्यंत सर्वाधिक ४८ हजार ४५८ संशयित रुग्णांची नोंद होऊन यातील ४ हजार ७९२ रुग्णांना हा आजार झाल्याचे निष्पन्न झाले.
कमी झालेला मलेरिया वाढला
मलेरिया म्हणजे हिवतापाचे २०२२ मध्ये १५ हजार ४५१ रुग्ण होते. २०२३ मध्ये ते कमी होऊन १६ हजार १५९ वर आले तर २०२४ मध्ये पुन्हा वाढ होऊन रुग्णसंख्या १७ हजार ४४० वर गेली.
मलेरियाच्या घातक प्रकाराने घेतला २१ जणांचा जीव
२०२२ मध्ये मलेरियाच्या 'प्लासमोडियम फेल्किपेराम (पीएफ) या घातक प्रकाराचे ८ हजार ९८३ रुग्ण व २६ मृत्यू होते. २०२३ मध्ये या प्रकाराचे ६ हजार २९७ रुग्ण व १९ मृत्यूची नोंद झाली असताना २०२४ मध्ये यात वाढ होऊन रुग्णसंख्या ७ हजार ६३३ वर पोहोचली आणि २१ जणांचे जीव गेले.
डेंग्यूच्या रुग्णसंख्येत घट
राज्यात सर्वच ठिकाणी २०२३ च्या तुलनेत २०२४ मध्ये डेंग्यूच्या रुग्णसंख्येत घट दिसून आली. २०२२ मध्ये डेंग्यूचे ८ हजार ५७८ रुग्ण व २७ मृत्यू, २०२३ मध्ये १९ हजार ३४ रुग्ण व ५५ मृत्यू तर २०२४ मध्ये १६ हजार ८४३ रुग्ण व २६ मृत्यूची नोंद झाली.