रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
By नरेश डोंगरे | Updated: November 5, 2025 06:42 IST2025-11-05T06:41:20+5:302025-11-05T06:42:04+5:30
प्रशासनाचा गोंधळ; अधिकृत माहितीसाठी 'वेट अँड वॉच'

रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
नरेश डोंगरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: छत्तीसगडमधील बिलासपूरजवळ मंगळवारी दुपारी झालेल्या भीषण अपघाताच्या वृत्ताने सर्वत्र प्रवाशांच्या आणि नातेवाइकांच्या काळजात चर्रर झाले. त्यांचा आक्रोश सुरू असताना रेल्वे प्रशासनाने जारी केलेली हेल्पलाइन पुरती हेल्पलेस असल्याचे स्पष्ट झाले.
भारतीय रेल्वेच्या प्रत्येक झोन (विभाग)मधील अधिकाऱ्यांकडून छोट्या-छोट्या कामांचा गवगवा केला जातो. प्रत्येक गोष्ट चढवून बढवून सांगितली जाते. मात्र, अडचणीच्या वेळी रेल्वेचे बहुतांश वरिष्ठ अधिकारी माहिती देण्यास टाळाटाळ करतात. जनसंपर्क अधिकारी हतबलता व्यक्त करतात. मंगळवारी दुपारी बिलासपूरजवळ झालेल्या भीषण अपघातानंतर पुन्हा त्याचा प्रत्यय आला. अपघाताचे वृत्त कळाल्यानंतर हादरलेल्या प्रवाशांच्या ठिकठिकाणच्या नातेवाइकांनी स्थिती जाणून घेण्यासाठी रेल्वेने जारी केलेल्या हेल्पलाइन नंबरवर संपर्क सुरू केले. मात्र, रात्री ९ वाजेपर्यंत कसलीही माहिती हेल्पलाइन नंबरवरून मिळत नव्हती.
'लोकमत' प्रतिनिधीने या संबंधाने शहानिशा करण्यासाठी रेल्वेच्या सर्वच हेल्पलाइनवर वारंवार संपर्क केले. मात्र, प्रतिसाद मिळत नव्हता. तर, घटनास्थळीच्या ९७५२४८५४९९ आणि ८६०२००७२०२ या दोन्ही क्रमांकावर अपघाताची माहिती मिळण्याऐवजी रेल्वेच्या १०० दिवसीय टीबी मुक्त जागरूकता अभियानाचा जागर होत होता. या संतापजनक प्रकाराबाबत दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे (बिलासपूर झोन) जनसंपर्क अधिकारी डॉ. सुष्कर विपूल यांच्याशी रात्री ९ पर्यंत प्रस्तुत प्रतिनिधीने वारंवार संपर्क केला. मात्र, त्यांनीही फोन उचलण्याची तसदी घेतली नाही. रेल्वेचे काही कर्मचारी 'वेट न वॉच'चा सल्ला देत होते.
डीआरएम यांच्याकडून दखल
लोकमतने रात्री दपूम रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक दीपककुमार गुप्ता यांना संपर्क केला. त्यांनी मृत अथवा जखमीबाबत कसलीही माहिती नसल्याचे स्पष्ट केले. अपघातस्थळी चार लाइन्स असल्याने रेल्वे संचालनावर फारसा प्रभाव पडला नाही, असेही स्पष्ट केले. संबंधित प्रवाशी तसेच नातेवाइकांची अस्वस्थता आणि हेल्पलेस हेल्पलाइनची जाणीव करून दिल्यानंतर त्यांनी स्थानिक पीआरओ मार्फत एक बुलेटीन जारी केले. त्यात अपघातामुळे नागपूर मार्गे धावणाऱ्या कोणत्या गाड्या प्रभावित झाल्या त्याची माहिती देण्यात आली.
दपूम रेल्वेच्या तीन गाड्या प्रभावित
दक्षिण पूर्व मध्य रेल्वेची कोरबा येथून ४.१० वाजता निघणारी ट्रेन नंबर १८५१७ कोरबा - विशाखापट्टनम एक्स्प्रेस ५ तास विलंबाने पोहचेल. कोरबा येथूनच सायंकाळी ६.१३ वाजता नागपूरसाठी निघणारी ट्रेन नंबर १८२३९ गेवरा रोड - नेताजी सुभाषचंद्र बोस एक्सप्रेस ३ तास ३० मिनिटे विलंबाने नागपूरकडे निघेल. बिलासपूरहून टाटानगरकडे सायंकाळी ६.५० वाजता निघणारी ट्रेन नंबर १८११४ ३ तास विलंबाने निघेल.