चंद्रशेखर बावनकुळेंकडे दुसऱ्यांदा नागपूरचे पालकत्व, फडणवीसांनी पुन्हा दाखविला विश्वास

By कमलेश वानखेडे | Updated: January 18, 2025 23:36 IST2025-01-18T23:36:07+5:302025-01-18T23:36:22+5:30

आशीष जयस्वाल यांचा गडचिरोलीत सन्मान

Chandrashekhar Bawankule gets Nagpur guardianship for the second time | चंद्रशेखर बावनकुळेंकडे दुसऱ्यांदा नागपूरचे पालकत्व, फडणवीसांनी पुन्हा दाखविला विश्वास

चंद्रशेखर बावनकुळेंकडे दुसऱ्यांदा नागपूरचे पालकत्व, फडणवीसांनी पुन्हा दाखविला विश्वास

नागपूर: राज्यभरातील पालकमंत्र्यांची यादी शनिवारी रात्री जाहीर झाली. नागपूरकर असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोलीचे पालकमंत्रीपद स्वीकारले. तर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा विश्वास दाखवित नागपूरचे पालकत्व सोपविले. सोबतच त्यांच्याकडे अमरावतीच्या पालकमंत्रीपदाचीही दुहेरी जबाबदारी देण्यात आली आहे.

मुख्यमंत्र्यांनी स्वत: पालकत्व घेतलेल्या गडचिरोली जिल्ह्याचे सह-पालकमंत्रीपद ॲड. आशीष जयस्वाल यांच्याकडे सोपवून त्यांचाही सन्मान राखला आहे. विशेष म्हणजे यामुळे जयस्वाल यांना गडचिरोली जिल्ह्यात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मार्गदर्शनात काम करता येईल. फडणवीस, बावनकुळे व जयस्वाल यांच्या रुपात नागपूर जिल्ह्याच्या वाट्याला तीन पालकमंत्रीपदे आली आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांनी यापूर्वीच ते गडचिरोलीचे पालकत्व घेण्यासाठी इच्छुक असल्याचे संकेत दिले होते. त्याचवेळी नागपूरची जबाबदारी बावनकुळे यांच्याकडे येईल हे स्पष्ट झाले होते. सोबतच अमरावतीची जबाबदारीही बावनकुळे यांच्याकडे सोपवून विदर्भातील सर्वात महत्वाच्या दोन्ही प्रशासकीय जिल्ह्यांचा कारभार मुख्यमंत्र्यांनी आपल्या विश्वासू व्यक्तिकडे सोपविला आहे.

बावनकुळे यांनी २०१४ ते २०१९ दरम्यान देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये नागपूसह तीन जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी पार पाडली होती. बावनकुळे यांची प्रशासन सांभाळण्याची हातोटी विलक्षण आहे. त्यांनी नागपूर जिल्हा परिषदेतील सदस्य म्हणून आपल्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली. त्यानंतर तीन वेळा ते विधानसभेचे आमदार आहेत. मधली दोन वर्षे ते विधान परिषदेचे सदस्य होते.

भारतीय जनता पक्षाच्या पक्षीय विस्तारात बावनकुळे यांनी प्रदेशअध्यक्ष म्हणून महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली. ऊर्जा मंत्री म्हणून २०१४ ते २०१९ या काळात काम करत असताना, चंद्रशेखर बावनकुळे यांनी मेळघाटातील दुर्गम भागात वीज पोहोचवण्याचे महत्त्वपूर्ण काम केले आहे.

बवनकुळेंची प्रशासनावर पकड
- बावनकुळे यांची प्रशासनावर पकड आहे. शुक्रवारी त्यांनी नागपूर जिल्हा परिषद व नागपूर महापालिकेचा आढावा घेतला. या बैठकीत त्याची झलक पहायला मिळाली. बावनकुळे यांचा विविध विषयांचा अभ्यास पक्का असल्यामुळे अधिकाऱ्यांनाही त्यांच्या प्रश्नावर उत्तर देताना दहावेळा विचार करावा लागतो.

प्रक्रिया उद्योगांना चालना देणार
- पालकमंत्री म्हणून नागपूर जिल्ह्यात रोजगार आणि उद्योग तसेच पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर भर दिला जाईल. उद्योगांना भेडसावणाऱ्या समस्यांचा अभ्यास करून उद्योगांना चालना देऊ. जिल्ह्यात निर्माण होणाऱ्या कृषी कृषी उत्पादनांवर प्रक्रिया करणारे उद्योग निर्माण करून शेतकरी व तरुणांना ताकद देऊ. तसेच महसूल व्यवस्था मजबूत करण्यासाठी तालुकानिहाय भेटी देवू. - चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री

Web Title: Chandrashekhar Bawankule gets Nagpur guardianship for the second time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.