नगपुरात EPFO ऑफिसमध्ये धडकली सीबीआय टीम; मोठ्या प्रमाणावर कागदपत्रे जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2022 14:52 IST2022-04-13T10:47:01+5:302022-04-13T14:52:10+5:30
सायंकाळपर्यंत सुरू असलेल्या या झाडाझडतीत सीबीआयच्या पथकाने बरीचशी कागदपत्रे, फाईल्स ताब्यात घेतल्या.

नगपुरात EPFO ऑफिसमध्ये धडकली सीबीआय टीम; मोठ्या प्रमाणावर कागदपत्रे जप्त
नागपूर : उपराजधानीतील वेगवेगळ्या भागात असलेल्या भविष्य निर्वाह निधी कार्यालयात (पीएफ ऑफिस) सीबीआयच्या दोन वेगवेगळ्या पथकांनी मंगळवारी धडक दिली. या कार्यालयातील अनेक फाईल्सची कसून तपासणी केल्यानंतर सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी तेथून मोठ्या प्रमाणावर कागदपत्रे ताब्यात घेतली.
रमणा मारोती परिसराजवळच्या आणि तुकडोजी चाैकाजवळच्या सोमवारी क्वॉर्टर परिसरात पीएफ ऑफिस आहेत. आफिस उघडताच सीबीआयच्या पथकाने आज तेथे धडक दिली. अधिकारी-कर्मचाऱ्यांना एका ठिकाणी बसवून त्यांनी कार्यालयाची झाडाझडती सुरू केली. सायंकाळपर्यंत सुरू असलेल्या या झाडाझडतीत सीबीआयच्या पथकाने बरीचशी कागदपत्रे, फाईल्स ताब्यात घेतल्या.
छाप्याचे कारण गुलदस्त्यात
सीबीआयचा हा छापा नेमका कोणत्या कारणासाठी होता, काय आरोप किंवा तक्रार आहे, त्याबाबत माहिती घेण्यासाठी सीबीआयच्या स्थानिक अधिकाऱ्यांशी संपर्क केला. मात्र, त्यांच्याकडून माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. या दोन ठिकाणीच छापा होता की आणखी अन्य काही ठिकाणी, ते सुद्धा कळू शकले नाही.