लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : सोमवारी विविध मागण्यांसाठी नागपूर सुधार प्रन्यासच्या कार्यालयावर मोर्चा घेऊन गेलेले युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस बंटी शेळके यांच्याविरोधात अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याविरोधात नासुप्रचे सभापती संजय मीणा यांनी तक्रार केली होती. शेळके यांनी जातिवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप मीणा यांनी केला होता. त्या आधारे सदर पोलिस ठाण्यात शेळकेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
६ जानेवारी रोजी शेळके यांनी पाऊण वाजण्याच्या सुमारास नासुप्र मुख्यालयावर मोर्चा काढला होता. काँग्रेसचे शहरातील मोठ्या पदाधिकाऱ्यांनी अगोदरच मोर्चाला पाठ दाखविली होती. शेळके व कार्यकर्त्यांना नासुप्रच्या प्रवेशद्वारावर पोलिस व सुरक्षारक्षकांनी अडविले. त्यामुळे त्यांनी प्रवेशद्वारावर चढून नारेबाजी केली. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांना बाईट दिले. यावेळी त्यांनी मीणा यांच्याबाबत शिवराळ भाषेचा उपयोग केला. तसेच मीणा यांच्या इभ्रतीवरच वार करावा लागेल असे म्हटले. हा प्रकार मीणा यांना सायंकाळी प्रसारमाध्यमांतून लक्षात आला. मीणा हे अनुसूचित जमाती वर्गातून येतात.
याची माहिती असूनदेखील शेळके यांनी जाणुनबुजून माझ्या जातीचा उल्लेख करत बदनामी केली व अपमान केला, अशी तक्रार त्यांनी सदर पोलिस ठाण्यात दिली. पोलिसांनी शेळकेंविरोधात अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.