टीबी वॉर्डातील प्रकरण : सज्जा कोसळल्याची दक्षता गुन्हे नियंत्रण मंडळाकडून चौकशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2019 22:59 IST2019-12-13T22:55:30+5:302019-12-13T22:59:20+5:30
मेडिकलच्या टीबी वॉर्ड परिसरातील त्वचा रोग विभागातील मुख्य प्रवेशद्वारावरील सज्जा कोसळल्याने गुरुवारी दोन जणांचा मृत्यू झाला. याची गंभीर दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने ‘दक्षता गुन्हे नियंत्रण मंडळ’कडून चौकशी करण्यात आली.

टीबी वॉर्डातील प्रकरण : सज्जा कोसळल्याची दक्षता गुन्हे नियंत्रण मंडळाकडून चौकशी
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मेडिकलच्या टीबी वॉर्ड परिसरातील त्वचा रोग विभागातील मुख्य प्रवेशद्वारावरील सज्जा कोसळल्याने गुरुवारी दोन जणांचा मृत्यू झाला. याची गंभीर दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने ‘दक्षता गुन्हे नियंत्रण मंडळ’कडून चौकशी करण्यात आली. दोन सदस्यांनी केलेल्या या चौकशीचा अहवाल मुख्य अभियंता उल्हास देबडवार यांच्याकडे सोपविल्याची माहिती आहे. तर, या घटनेला घेऊन इमामवाडा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) अंतर्गत येणाऱ्या इमारतीच्या देखभालीची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम (वैद्यकीय) विभागाची आहे. नियमानुसार, दरवर्षी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षकांच्यास्तरावर त्यांच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या इमारतीची तपासणी करणे, आणि दर पाच वर्षांनी कार्यकारी अभियंतांनी त्या इमारतीची तपासणी करून तसा अहवाल सादर करणे आवश्यक असते. घटना घडलेल्या त्वचा रोग विभागाच्या इमारतीची तशी तपासणी करण्यात आली होती का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या घटनेला गंभीरतेने घेत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ‘दक्षता गुन्हे नियंत्रण मंडळ’कडून दोन सदस्यांनी शुक्रवारी त्वचा रोग विभागाच्या इमारतीला भेट दिली. त्यांनी घटनास्थळपासून इमारतीच्या इतरही भागाची पाहणी केली. सायंकाळी त्यांनी मुख्य अभियंता देबडवार यांना आपला अहवालही सादर केल्याचेही समजते. यामुळे या घटनेचा ठपका कुणावर ठेवला जातो, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
अकस्मात मृत्यूची नोंद
त्वचा रोग विभागात उपचार घेत असलेल्या रुग्णाच्या नातेवाईक वनिता सुधाकर वाघमारे (३६) व देवनाथ रामचंद्र बागडे (६६) यांच्या अंगावर प्रवेशद्वारावरील सज्जा पडून मृत्यू झालेल्या प्रकरणात इमामवाडा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. अद्यापही कुणावर गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.
बागडे यांच्या कुटुंबीयांनी मागितली आर्थिक मदत
त्वचा रोग विभागात उपचार घेत असलेले मृत देवनाथ बागडे यांच्या कुटुंबीयांनी शुक्रवारी मेडिकलमध्ये जाऊन अधिष्ठात्यांची भेट घेतली. त्यांनी आर्थिक भरपाईची मागणीचे पत्र दिले. मेडिकल प्रशासनाने हे पत्र जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केल्याची माहिती आहे.