एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2025 23:14 IST2025-10-30T23:13:35+5:302025-10-30T23:14:20+5:30

Bacchu kadu Morcha: बेकायदेशीर रस्ता अडविणे, नागरिकांची गैरसोय केल्याचा पोलिसांनी ठेवला ठपका 

Case registered against thousands of farmer protesters including Bachchu Kadu, Raju Shetty | एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल

एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल

-योगेश पांडे, नागपूर
शेतकरी आंदोलनादरम्यान नागपुरकरांसह हजारो नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास व मन:स्ताप सहन करावा लागला. बेकायदेशीरपणे महामार्ग अडविणे व नागरिकांची गैरसोय केल्याचा ठपका ठेवत नागपूर पोलिसांनी प्रहार प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू, माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासोबत अडीच हजारांच्या जवळपास आंदोलकांवर गुन्हा दाखल केला आहे. 

मंगळवारी दुपारी साडेतीन वाजताच्या आसपास शेतकरी आंदोलक जामठ्याजवळ पोहोचले. त्यांना सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ कॉटन रिसर्चजवळील मोकळ्या जागेत आंदोलन करण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र आंदोलकांनी वर्धा मार्गच अडविला आणि जवळपास ३० तासांहून अधिक वेळ संपूर्ण महामार्गावर कोंडी होती. 

यामुळे नागरिकांचे अतोनात हाल झाले. जनतेतून याबाबत प्रचंड रोष व्यक्त करण्यात आला होता. वाहनांमध्ये अडकलेल्यांना अन्न आणि पाण्यापासून वंचित ठेवण्यात आले, ज्यामुळे अनेकांचे जीवन आणि मालमत्ता धोक्यात आली. त्यामुळे आंदोलक तेथून हटल्यानंतर हिंगणा पोलिसांनी अटींचे उल्लंघन करणे, बेकायदेशीरपणे जमून नागरिकांचे जीवन आणि मालमत्ता धोक्यात आणणे आणि वाहतुकीत अडथळा आणणे यासारख्या विविध कलमांखाली त्यांच्यावर गुन्हा दाखल केला, अशी माहिती ठाणेदार जितेंद्र बोबडे यांनी दिली. 

महादेव जानकर, शेतकरी नेते रविकांत तुपकर, नितेश कराळे, अजित नवले, वामनराव चटप यांच्याविरोधातदेखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बच्चू कडू आणि इतर नेत्यांविरुद्ध यापूर्वीही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, त्या प्रकरणांमध्ये त्यांना सशर्त जामिनावर सोडण्यात आले आहे. आता त्यातील अटींचे उल्लंघन केल्यामुळे या नेत्यांविरोधात कारवाई होण्याचीदेखील शक्यता आहे.

Web Title: Case registered against thousands of farmer protesters including Bachchu Kadu, Raju Shetty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.