खोटे दस्तावेज देऊन फसवणूक; दोन डॉक्टरांविरोधात दीड वर्षानंतर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2022 14:39 IST2022-06-23T14:30:34+5:302022-06-23T14:39:52+5:30
या प्रकरणात तक्रारीनंतर तब्बल दीड वर्षानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

खोटे दस्तावेज देऊन फसवणूक; दोन डॉक्टरांविरोधात दीड वर्षानंतर गुन्हा दाखल
नागपूर : उपचारात हलगर्जीपणा केल्याचा आरोप असलेल्या दोन डॉक्टरांविरुद्ध खोटे दस्तावेज देऊन फसवणूक करण्याचा गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणात तक्रारीनंतर तब्बल दीड वर्षानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. डॉ. अश्विनीकुमार खांडेकर आणि डॉ. वरुण भार्गव, अशी या डॉक्टरांची नावे आहेत.
धरमपेठ येथील रहिवासी मोनाल थूलचे वडील अरुण थूल हे सेवानिवृत्त कर्मचारी होते. १७ ऑक्टोबर २०२० रोजी त्यांची प्रकृती खालावली. मोनालने त्यांना रामदासपेठ येथील गंगा केअर रुग्णालयात दाखल केले. मोनालच्या वडिलांचा २८ ऑक्टोबर २०२० रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला. उपचारात निष्काळजीपणा केल्यामुळे वडिलांचा मृत्यू झाल्याची तक्रार मोनालने सीताबर्डी पोलीस ठाण्यात दिली. पोलिसांनी त्याचा तपास केला.
मोनालने आरटीआयद्वारे वडिलांच्या उपचाराची कागदपत्रे मिळविली. यामध्ये मोनालला त्याच्या आयपीडी पेपरवर डॉ. खांडेकर आणि डॉ. भार्गव यांच्या बनावट सह्या झाल्याची माहिती मिळाली. तसेच दोन्ही डॉक्टरांनी सीजीएचएसकडे उपचाराची बनावट बिलेही सादर केल्याचे आढळून आले. मोनालच्या तक्रारीच्या आधारे सीताबर्डी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.