नागपुरात कारने घेतला दुचाकीस्वाराचा बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2018 20:18 IST2018-08-06T20:17:42+5:302018-08-06T20:18:41+5:30
रात्री बेरात्री अनेकांना घरपोच खाद्यपदार्थ पोहचवून त्यांची भूक भागविणाऱ्या एका दुचाकीचालकाचा कारचालकाने बळी घेतला.

नागपुरात कारने घेतला दुचाकीस्वाराचा बळी
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रात्री बेरात्री अनेकांना घरपोच खाद्यपदार्थ पोहचवून त्यांची भूक भागविणाऱ्या एका दुचाकीचालकाचा कारचालकाने बळी घेतला. नीलेश नवनाथ वासनिक (वय २९) असे मृताचे नाव आहे. तो अमरावती मार्गावरील पंकजनगरात राहत होता.
खाद्यपदार्थांची घरपोच सेवा देणाऱ्या झोमॅटो कंपनीत नीलेश काम करीत होता. रविवारी मध्यरात्रीनंतर सुमारे १.३० च्या सुमारास नीलेश त्याच्या दुचाकीने सीताबर्डीतून जात असताना धन्वंतरी हॉस्पिटल चौकाजवळ आरोपी वॅगनआर कार (एमएच ३१/ सीपी ९५७२) च्या चालकाने त्याला जोरदार धडक मारली. गंभीर जखमी झालेल्या नीलेशला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. नीलेशचा भाऊ सिद्धार्थ याने दिलेल्या तक्रारीवरून सीताबर्डी पोलिसांनी आरोपी कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्याचा शोध घेतला जात आहे.