नागपूर : रेल्वेत गुन्हेगारी करणाऱ्या ठिकठिकाणच्या सराईत गुन्हेगारांवर रेल्वेच्यापोलिस अधीक्षकांनी धडक कारवाईची मोहिम राबविली आहे. त्यानुसार गेल्या दोन आठवड्यात विदर्भातील १९ गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.
रेल्वेत गुन्हेगारी करणारे काही विशिष्ट सराईत गुन्हेगार वारंवार ईकडे तिकडे फिरून गुन्हे करतात. त्यांना रेल्वेत गुन्हेगारी केल्यानंतर कुठून कुठे पळून जायचे, याची माहिती असते. त्यामुळे हे भामटे गुन्हे केल्यावर पोलिसांच्याही हाती लागत नाहीत. त्यामुळे बरेचदा पोलिसांच्या विरोधात जनमत तयार होते. अनेकदा कायदा आणि सुव्यवस्थेचाही प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे रेल्वेत गुन्हेगारी करणारांना पायबंद घालण्यासाठी संशयीत आणि सराईत गुन्हेगारांची कुंडली गोळा करण्याचे आदेश गेल्या दोन आठवड्यांपूर्वी पोलीस अधीक्षक पोलीस अधीक्षक, आयपीएस डॉ. प्रियंका नारनवरे यांनी सर्व रेल्वे पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांना दिली होती. त्यानुसार, वेगवेगळ्या पोलीस ठाण्यातून दोन डझनवर नावे पुढे आली. त्यातील १९ गुन्हेगारांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर वेगवेगळ्या शहरातील रेल्वे पोलीस ठाण्यात कलम १२६,१२७ आणि १२९ भारतीय नागरीक सुरक्षा संहितेनुसार प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. अशा प्रकारे एकाच वेळी एवढ्या संख्येत सराईत गुन्हेगारांवर कारवाई होण्याची रेल्वे पोलिसांमधील ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे रेल्वेत गुन्हेगारी करून पळून जाणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.
लिहून घेतले बंधपत्र
विशेष कार्यकारी दंडाधिकारी तथा पोलीस अधीक्षक लोहमार्ग डॉ. नारनवरे यांनी प्रतिबंधात्मक कारवाई करतानाच या सर्व गुन्हेगारांकडून विशिष्ट रकमेचे बंधपत्र लिहून घेण्यात आले. यापुढे कसल्याही प्रकारची गुन्हेगारी करणार नाही आणि चांगले वर्तन ठेवेल, असे या बंधपत्रात सर्व संशयीतांनी लिहून दिले.
पोलीस स्टेशन आणि गुन्हेगार
प्रतिबंधात्मक कारवाई झालेल्या १९ गुन्हेगारांमध्ये कोण, कुठल्या रेल्वे पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवर आहेत, त्याची माहिती पुढील प्रमाणे आहे. सर्वाधिक सराईत ७ गुन्हेगार अकोला (अकोट फैल), रेल्वे पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवर असून, त्यानंतर रेल्वेत गुन्हेगारी करणारांमध्ये गोंदिया (भीमनगर, गोरेगाव, गोंदिया) रेल्वे पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील ४ गुन्हेगारांचा समावेश आहे. नागपूर ३ (ईमामवाडा, बजेरिया) तर ईतवारी रेल्वे पोलीस स्टेशन १, वर्धा (ईतवारा, पुलगाव) आणि बडनेरा (बडनेरा शहर) रेल्वे ठाण्यात प्रत्येकी २ गुन्हेगारांचा समावेश आहे.
रेल्वे गाड्यांमध्ये किंवा रेल्वे स्थानक परिसरात गुन्हे होऊ नये, गुन्हेगारांवर वचक राहावा, यासाठी रेल्वे पोलिसांकडून आवश्यक ती खबरदारी घेतली जात आहे. गुन्हेगारांवर वचक राहावा, हा प्रतिबंधात्मक कारवाईचा उद्देश आहे - डॉ. प्रियंका नारनवरे, रेल्वे पोलीस अधीक्षक, नागपूर