नागरिकांचे राहणीमान सोईचे करणार ‘कॅग’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2017 12:29 AM2017-10-15T00:29:33+5:302017-10-15T00:29:57+5:30

फूटपाथवर अतिक्रमण केल्यामुळे नागरिकांना चालणेही कठीण होते, अनेक दुकानदार आपल्या प्रतिष्ठानांसमोर दुकानाचे बोर्ड लावत असल्यामुळे वाहतुकीस अडथळा होतो तर पार्किंगमुळे नागरिकांची होणारी गैरसोय....

'CAG' to ease living of citizens | नागरिकांचे राहणीमान सोईचे करणार ‘कॅग’

नागरिकांचे राहणीमान सोईचे करणार ‘कॅग’

Next
ठळक मुद्देविवेक रानडे : परिसराला अतिक्रमणमुक्त करण्याचा संकल्प

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : फूटपाथवर अतिक्रमण केल्यामुळे नागरिकांना चालणेही कठीण होते, अनेक दुकानदार आपल्या प्रतिष्ठानांसमोर दुकानाचे बोर्ड लावत असल्यामुळे वाहतुकीस अडथळा होतो तर पार्किंगमुळे नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेता या समस्यांपासून धरमपेठ परिसरातील नागरिकांना दिलासा देण्यासाठी सिव्हीक अ‍ॅक्शन ग्रुप (कॅग) तयार करण्यात आला असूून ‘कॅग’तर्फे नागरिकांचे राहणीमान सोईचे करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत, अशी माहिती विवेक रानडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
विवेक रानडे म्हणाले, कॅगने आतापर्यंत ट्रॅफिक पार्क परिसरातील हॉकर्सचे अतिक्रमण हटविले आहे. लक्ष्मीभुवन, लक्ष्मीनारायण मंदिर परिसरातील अतिक्रमण सीताबर्डी पोलिसांच्या सहकार्याने हटविले आहे. धरमपेठ परिसरातील सर्व दुकानांच्या रांगेतील अतिक्रमण हटविण्यात आले. कॅगने १० ते १४ आॅक्टोबर दरम्यान आयोजित केलेल्या आधार कॅम्पमध्ये ६०० नागरिकांचे आधार कार्ड तयार करण्यात आले आहे. भविष्यात कॅगतर्फे धरमपेठ परिसरातील फूटपाथ मोकळे करणे, पार्किंगसाठी जागा ठरवून देणे, अपार्टमेंट, नागरिकांच्या घरासमोर फूटपाथवर टाकण्यात आलेले स्लोप हटविण्यात येणार आहे. कॅगने चार गट तयार केले असून त्यात एक गट अतिक्रमणाच्या विरोधात, दुसरा स्वच्छतेच्या क्षेत्रात, तिसरा जनजागृती आणि चौथा ग्रुपबद्दल लोकांना माहिती देऊन जनसंपर्क प्रस्थापित करणार असल्याचे रानडे म्हणाले. सीताबर्डीचे पोलीस निरीक्षक हेमंत कुमार खराबे म्हणाले, नागरी सुविधांबाबत लोकांमध्ये जागृती नसून कॅगतर्फे करण्यात येणारे प्रयत्न कौतुकास्पद आहेत. भविष्यात असे ग्रुप नागपूर शहरात सर्वत्र तयार झाल्यास नागपूर शहर सुंदर होणार असल्याचे त्यांनी सांगितले. महापालिकेचे सहायक आयुक्त महेश मोरोणे म्हणाले, कॅग हे नागपूरकरांसाठी रोल मॉडेल आहे. परिसरातील नागरिकांना फूटपाथवर तयार केलेले स्लोप काढून घ्यावेत, हे स्लोप न काढल्यास महापालिका दंडात्मक कारवाई करेल. घरासमोर बांधकामाचा मलबाही नागरिकांनी उचलावा. अन्यथा महापालिका जेसीबीच्या साहाय्याने हा मलबा उचलून त्यासाठी लागणारे मनुष्यबळ, जेसीबीचे भाडे हा संपूर्ण खर्च संबंधित घर मालकाकडून वसूल करेल. इमारतीतील पार्किंगच्या जागेचा वापर केवळ पार्किंगसाठीच होणे आवश्यक असून त्याचा इतर कारणांसाठी वापर होत असल्यास महापालिकेतर्फे कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला. पत्रकार परिषदेला नचिकेत काळे आणि कॅगचे सदस्य उपस्थित होते.

Web Title: 'CAG' to ease living of citizens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.