सव्वा अकरा लाखांची घरफोडी, चोरट्यांनी सीसीटीव्हीचा डीव्हीआरदेखील पळविला
By योगेश पांडे | Updated: July 10, 2023 12:26 IST2023-07-10T12:25:42+5:302023-07-10T12:26:29+5:30
कपिलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना

सव्वा अकरा लाखांची घरफोडी, चोरट्यांनी सीसीटीव्हीचा डीव्हीआरदेखील पळविला
नागपूर : पुण्याला गेलेल्या एका कुटुंबाला चांगलाच धक्का बसला आहे. घराला कुलूप असल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करत सुमारे सव्वाअकरा लाखांचा मुद्देमाल लंपास केला. आश्चर्याची बाब म्हणजे ओळख पटू नये यासाठी चोरांनी जाताना सीसीटीव्हीचा डीव्हीआरदेखील चोरून नेला. कपिलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
मंगेश गोविंदराव दहीवाले (५३,बॅंक कॉलनी, सन्यालनगर) असे तक्रारदाराचे नाव आहे. मंगेश ५ जुलै रोजी कुटुंबियांसह पुण्याला गेले. जाताना ते कुलूप लावून गेले होते व रविवार ९ जुलै रोजी परतले. या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. चोरट्यांनी बेडरूममधील कपाटातून सोन्याचांदीचे दागिने, लॅपटॉप असा ११ लाख २२ हजारांचा मुद्देमाल चोरून नेला. सोबतच जाताना सीसीटीव्हीचा डीव्हीआरदेखील पळवून नेला. घरी परत आल्यावर मंगेश यांना घरफोडी झाल्याचे लक्षात आले. त्यांच्या तक्रारीवरून कपिलनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.