‘बंटी-बबली’ने ज्वेलरच्या दुकानातून दागिने उडविले, मात्र सीसीटीव्हीमुळे अडकले
By योगेश पांडे | Updated: June 14, 2023 15:41 IST2023-06-14T15:40:14+5:302023-06-14T15:41:06+5:30
तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना

‘बंटी-बबली’ने ज्वेलरच्या दुकानातून दागिने उडविले, मात्र सीसीटीव्हीमुळे अडकले
नागपूर : एका ‘बंटी-बबली’ने इतवारीतील ज्वेलर्सच्या दुकानातून हातचलाखी करत सोन्याची कर्णफुले उडविली, मात्र सीसीटीव्हीमुळे ते पोलिसांच्या जाळ्यात अडकले. तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली असून दोन्ही आरोपी उत्तरप्रदेशमधील आहेत.
उत्तम व्यंकटेश सावरकर (५४, टांगा स्टॅंड, इतवारी) यांचे सावरकर ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. १० जून रोजी दुपारच्या सुमारास एक महिला व पुरुष त्यांच्या दुकानात आले. त्यांनी काही दागिने खरेदी करण्याची इच्छा दर्शविली. सावरकर त्यांना दागिने दाखवत होते. ते परत गेल्यावर ६ ग्रॅमची कर्णफुले गायब असल्याचे लक्षात आले. सावरकर यांनी सीसीटीव्ही फुटेज पाहिले असता महिला-पुरुषानेच ते गायब केल्याची बाब समोर आली. त्यांनी तहसील पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली.
पोलिसांनी दुकान तसेच परिसरातील सीसीटीव्हीच्या माध्यमातून दोन्ही आरोपींचा शोध घेतला. तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी सतिश रामस्वरूप सोनी (४५) व राणीदेवी संतोषकुमार सोनी (५०) या दोघांना अटक केली. दोन्ही आरोपी उत्तरप्रदेशमधील उन्नाव येथील शुक्लागंज, प्रेमनगर येथील रहिवासी आहेत. या दोघांनी अशा पद्धतीने नागपुरात इतरही ठिकाणी चोरी केली आहे का याचा तपास सुरू आहे.