बिल्डर डांगरे पोलिसांना मिळेना : गुन्हे शाखेकडून पत्नीची विचारपूस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2020 20:48 IST2020-07-10T20:47:10+5:302020-07-10T20:48:30+5:30
आरक्षण असलेल्या जमिनीवर बंगलो स्कीम निर्माण करण्याची थाप मारून अनेकांची आयुष्याची कमाई गिळंकृत करणारा वादग्रस्त बिल्डर विजय डांगरे याला शोधून काढण्यासाठी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शुक्रवारी त्याच्या पत्नीची विचारपूस केली. पोलिसांनी डांगरेच्या मित्रांवरही नजर रोखली आहे.

बिल्डर डांगरे पोलिसांना मिळेना : गुन्हे शाखेकडून पत्नीची विचारपूस
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आरक्षण असलेल्या जमिनीवर बंगलो स्कीम निर्माण करण्याची थाप मारून अनेकांची आयुष्याची कमाई गिळंकृत करणारा वादग्रस्त बिल्डर विजय डांगरे याला शोधून काढण्यासाठी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शुक्रवारी त्याच्या पत्नीची विचारपूस केली. पोलिसांनी डांगरेच्या मित्रांवरही नजर रोखली आहे.
बिल्डर डांगरेने काही वर्षांपूर्वी आकर्षक ब्रोशरवर बंगलो उभारण्याची स्कीम तयार केली. ज्या जागेवर ही स्कीम उभारणार, ती जागा डम्पिंग यार्ड साठी आरक्षित असल्याने आवश्यक सरकारी मंजुरी मिळणार नाही, याची कल्पना त्याला होती. मात्र त्याने फसवणूक करण्याच्या उद्देशानेच कटकारस्थान करून अनेकांना बंगल्याचे स्वप्न दाखविले आणि त्यांची आयुष्यभराची रक्कम गिळंकृत केली. त्यातील हिरा यशवंत दलाल, प्रदीप नीळकंठ खोडे, राजीव ज्ञानेश्वर मेघरे आणि रमेश नागोराव पिसे या चौघांनी डांगरेविरुद्ध न्यायालयीन लढाई सुरू ठेवली. त्यामुळे गुन्हा दाखल झाल्याने जामीन मिळवण्यासाठी डांगरेने उपरोक्त चौघांना त्यांचे दोन कोटी रुपये परत करतो, असे सांगून न्यायालयातून सशर्त जामीन मिळवला. मात्र ही रक्कम या चौघांना परत न करता त्यांना जिवे ठार मारण्याच्या धमक्या दिल्या. प्रकरण न्यायप्रविष्ट असताना वादग्रस्त जागा दुसऱ्या बिल्डरला विकून टाकली. बिल्डर डांगरेने हा निर्ढावलेपणा सक्करदरा आणि हुडकेश्वर पोलिसांसोबत मधुर संबंध असल्यामुळे केल्याचा आरोप आहे. या पार्श्वभूमीवर, पोलीस उपायुक्त विवेक मासाळ यांनी खडसावल्यामुळे सोमवारी हुडकेश्वर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. परंतु पाच दिवस होऊनही डांगरेला पोलिसांनी अटक केली नाही. त्यामुळे एकीकडे उपायुक्त मासाळ यांचे पथक फरार डांगरेला शोधत आहे तर दुसरीकडे गुन्हे शाखेचे पथकही डांगरेला जागोजागी शोधत आहे. त्याचा पत्ता मिळण्यासाठी गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी डांगरेच्या पत्नीला दिवसभर विचारपूस केली. त्यांच्याकडून काय माहिती मिळाली, हे मात्र वृत्त लिहिस्तोवर स्पष्ट होऊ शकले नाही. डांगरेच्या काही मित्रांवर नजर ठेवूनही पोलीस त्याचा पत्ता शोधण्याचा प्रयत्न करीत आहेत.
पोलिसांनाही दिला चकमा
विशेष म्हणजे, ज्या दिवशी गुन्हा दाखल झाला. त्या रात्री दोन पोलीस डांगरेच्या घरी पोहोचले. त्यांना कपडे बदलून येतो, तुम्ही बाहेरच थांबा, असे सांगून डांगरे आतमध्ये गेला आणि मागच्या दारातून पळून गेल्याचे हुडकेश्वर पोलीस सांगत आहेत. दरम्यान, फरार डांगरेला पकडण्याबाबत पोलिसांनी थंड भूमिका घेतल्याचा आरोप होत आहे. या पार्श्वभूमीवर, गुन्हे शाखेचे पथक सक्रिय करण्यात आल्याचे अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. नीलेश भरणे यांनी सांगितले. आम्ही लवकरच डांगरेला जेरबंद करू, असेही डॉ. भरणे म्हणाले.