बिहारच्या बुद्धगया मुक्तीसाठी बौद्धांनी कसली कंबर; महाविहाराचा ताबा देण्यासाठी १२ फेब्रुवारी २०२६ ला करणार संसदेचा घेराव
By आनंद डेकाटे | Updated: September 27, 2025 19:32 IST2025-09-27T19:23:42+5:302025-09-27T19:32:26+5:30
Nagpur : बिहारच्या बुद्धगया येथील महाबोधी महाविहार मुक्तीसाठी बौद्धांनी कंबर कसली आहे. विविध माध्यमांतून यासाठी देशभर जनजागृती करण्यात येत असून बीटी ॲक्ट १९४९ रद्द करून महाविहाराचा ताबा बौद्धांना देण्याची एकमुखी मागणी होत आहे.

Buddhists are firm for the liberation of Bodh Gaya in Bihar; They will surround Parliament on February 12, 2026 to take control of the Mahavihara
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बिहारच्या बुद्धगया येथील महाबोधी महाविहार मुक्तीसाठी बौद्धांनी कंबर कसली आहे. विविध माध्यमांतून यासाठी देशभर जनजागृती करण्यात येत असून बीटी ॲक्ट १९४९ रद्द करून महाविहाराचा ताबा बौद्धांना देण्याची एकमुखी मागणी होत आहे. याअंतर्गत आता १२ फेब्रुवारी २०२६ रोजी भन्ते विनयाचार्य यांच्या नेतृत्वात बुद्धिस्ट समन्वय संघाने संसद घेरावाची घोषणा केली आहे, अशी माहिती बुद्धिस्ट समन्वय संघ समितीचे निमंत्रक नितीन गजभिये यांनी शनिवारी पत्रपरिषदेत दिली.
भन्ते विनयाचार्य यांचा जनसंवाद कार्यक्रम धम्मध्वज यात्रा १६ ऑगस्ट २०२५ रोजी पवित्र दीक्षाभूमी येथून सुरू झाली. पहिल्या टप्प्यात २ सप्टेंबर, २०२५ रोजी मुंबईतील चैत्यभूमी व दुसऱ्या टप्प्यात पुण्यातून सुरू झालेली धम्मयात्रेचा समारोप २४ सप्टेंबर, २०२५ रोजी सौंसर येथे झाला. या यात्रेच्या माध्यमातून लाखो लोकांपर्यंत मुक्ती आंदोलन गेले. समाजात शांती, सहकार्य आणि समजूतदारपणा वाढवणे हे, बौद्ध धर्माचे मुख्य तत्त्व आहे. ते या माध्यमातून पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. पत्रपरिषदेत राकेश धारगावे, रत्नदीप रंगारी, योगेश राऊत, स्मिता वाकडे, दिनेश शेंडे, मोंटी खुटे, विलास मेश्राम, मुकेश मेश्राम आदी उपस्थित होते.
भन्ते विनयाचार्य, आकाश लामा यांना दीक्षाभूमीवर आमंत्रित करावे
देशामध्ये महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन सुरू अहे. भन्ते विनयाचार्य, आकाश लामा यांच्या नेतृत्वात हे आंदोलन सुरू आहे. महाबोधी मुक्ती आंदोलन व बीटी ॲक्ट १९४९ काय आहे, याची माहिती देशाला व्हावी यासाठी दीक्षाभूमी येथील मुख्य कार्यक्रमात दोघांनाही मुख्य अतिथी म्हणून आमंत्रित करावे अशी मागणी यावेळी राकेश धारगावे यांनी केली.