रक्षाबंधनावर बहिण-भावांनी भरली एसटीची तिजोरी : ४ दिवसांत तब्बल १३७ कोटींचं उत्पन्न!

By नरेश डोंगरे | Updated: August 12, 2025 18:43 IST2025-08-12T18:39:04+5:302025-08-12T18:43:31+5:30

सण रक्षाबंधनाचा, गिफ्ट १३७ कोटींचे : चार दिवसांत एसटीच्या तिजोरीत विक्रमी उत्पन्न

Brothers and sisters filled ST's coffers on Raksha Bandhan: Income of Rs 137 crore in 4 days! | रक्षाबंधनावर बहिण-भावांनी भरली एसटीची तिजोरी : ४ दिवसांत तब्बल १३७ कोटींचं उत्पन्न!

Brothers and sisters filled ST's coffers on Raksha Bandhan: Income of Rs 137 crore in 4 days!

नरेश डोंगरे - नागपूर 
लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : वर्षानुवर्षांपासून कोट्यवधी प्रवाशांची सेवा करणाऱ्या एसटीच्या 'लालपरी'ला यंदा रक्षाबंधनाचे औचित्य साधून १ कोटी, ९३ लाख बहिण-भावांनी जवळ केले. राखीनिमित्त या बहिण भावांनी अवघ्या चार दिवसांत लालपरीला १३७.३७ कोटी रुपयांची प्रवासभाड्याच्या रुपाने ओवाळणीही घातली. यंदाच्या आर्थिक वर्षातील एसटीचे हे सर्वोच्च उत्पन्न आहे.

दरवर्षी रक्षाबंधन आणि दिवाळीतील भाऊबीज या सणांदरम्यान बहिण-भावंडं एकमेकांच्या भेटींसाठी मिळेल त्या साधणाने प्रवास करतात. त्यात एसटी महामंडळाच्या लालपरीला सर्वाधिक पसंती दिली जाते. यंदाही रक्षाबंधनच्या अगोदरच्या दिवसापासून अर्थात ८ ऑगस्टपासून तो ११ ऑगस्टपर्यंत सलग एसटीची प्रत्येक बस प्रवाशांनी भरभरून धावताना दिसत होती. अशा प्रकारे या चार दिवसांत १ कोटी, ५ लाख भावंडांनी तर, ८८ लाख बहिणींनी एसटीतून प्रवास करीत एसटीच्या तिजोरीत तब्बल १३७ कोटी, ३७ लाख रुपयांची ओवाळणी टाकली. एसटीच्या ताटात (तिजोरीत) नेहमीच खडखडाट असतो, असे म्हटले जाते. मात्र, यावेळी बहिण-भावांनी मिळून एसटीच्या आरतीचे ताट भरघोस उत्पन्नाच्या रुपात खणखणीत भरून टाकले आहे.

अशी राहिली ओवाळणीची रक्कम

  • ८ ऑगस्ट : ३० कोटी, सहा लाखांचे उत्पन्न. (त्यात नागपूर जिल्ह्याचे उत्पन्न ४५ लाख, ९५ हजार, २५९ रुपये आहे)
  • ९ ऑगस्ट : रक्षाबंधनाचा मुख्य दिवस - ३४ कोटी, ८६ लाखांचे उत्पन्न (त्यात नागपूर जिल्ह्याचे उत्पन्न ६० लाख, ९६ हजार, ५७६ रुपये)
  • १० ऑगस्ट : ३३ कोटी, ३६ लाखांचे उत्पन्न (नागपूर जिल्ह्याचे उत्पन्न ५६ लाख, ६४ हजार, ६२५ रुपये)
  • ११ ऑगस्ट : सर्वाधिक ३९ कोटी, ९ लाखांचे उत्पन्न (नागपूर जिल्ह्याचे उत्पन्न ६८ लाख, ८६ हजार, १८६ रुपये)

 

एसटीच्या तिजोरीत एका दिवशी (११ ऑगस्टला) जमा झालेले ३९.९ कोटींचे हे उत्पन्न सुरू असेलल्या आर्थिक वर्षातील आतापर्यंतचे सर्वाधिक उत्पन्न ठरले आहे, हे येथे उल्लेखनीय !

परिवहन मंत्र्यांकडून आभार

रक्षाबंधनाच्या सणानिमित्त एसटीला मोठ्या प्रमाणात प्रवाशांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल महामंडळाचे अध्यक्ष, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आभार मानले आहे. त्यांनी घरी सण असताना देखिल कर्तव्याला प्राधान्य देऊन एसटीच्या तिजोरीत विक्रमी उत्पन्नाची भर घालणाऱ्या कर्मचाऱ्यांचेही आज जारी केलेल्या एका पत्रातून अभिनंदन केले आहे.
 

Web Title: Brothers and sisters filled ST's coffers on Raksha Bandhan: Income of Rs 137 crore in 4 days!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.