ब्रॉडगेज मेट्रोने पूर्ण होणार वैदर्भीयांचे स्वप्न; उद्योजक आले पुढे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 10:44 AM2021-07-16T10:44:06+5:302021-07-16T10:46:52+5:30

Nagpur News भारतीय रेल्वेच्या ब्रॉडगेज रुळावर मेट्रो चालविण्याचा प्रकल्प केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून पुढे आला असून, या संकल्पनेला मूर्त स्वरूप देण्यासाठी विदर्भातील उद्योजक पुढे आले आहेत.

Broadgauge Metro will fulfill the dream of Vaidarbhis; Entrepreneurs came forward | ब्रॉडगेज मेट्रोने पूर्ण होणार वैदर्भीयांचे स्वप्न; उद्योजक आले पुढे

ब्रॉडगेज मेट्रोने पूर्ण होणार वैदर्भीयांचे स्वप्न; उद्योजक आले पुढे

googlenewsNext
ठळक मुद्दे मेट्रो चालविण्याची तयारी रोजगाराच्या संधी निर्माण होणार

मोरेश्वर मानापुरे

 लोकमत न्यूज नेटवर्क 

नागपूर : भारतीय रेल्वेच्या ब्रॉडगेज रुळावर मेट्रो चालविण्याचा प्रकल्प केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून पुढे आला असून, या संकल्पनेला मूर्त स्वरूप देण्यासाठी विदर्भातील उद्योजक पुढे आले आहेत. या प्रकल्पासाठी स्पेशल पर्पज व्हेईकल (एसपीव्ही) कंपनी स्थापन करण्यात येणार आहे. या कंपनीच्या माध्यमातून संचालन होणाऱ्या ब्रॉडगेज मेट्रो प्रकल्पामुळे वैदर्भीयांचे विकासाचे स्वप्न पूर्ण होणार आहे.

काय आहे प्रस्ताव

प्रकल्पाच्या दोन टप्प्यात भारतीय रेल्वेच्या अजनी स्टेशनवरून नागपूरच्या चहुबाजूला ७५४ किमी अंतरावर मेट्रो धावणार आहे. पहिल्या टप्प्यात अजनी स्टेशनवरून वर्धा (७८.८ किमी), भंडारा रोड (५९.२ किमी), रामटेक (४१.६ किमी) , नरखेड (८५.५ किमी) या मार्गावर ब्रॉडगेज मेट्रोचे २६५.१ किमीचे अंतर राहणार आहे. विदर्भातील ४२ ठिकाणांना जोडणारा प्रकल्प आहे. एकूण गुंतवणूक ४०८ कोटींची असून, ४२ स्टेशन राहणार आहेत.

असा झाला करार

गडकरी यांच्या पुढाकाराने भारतीय रेल्वे, महाराष्ट्र शासन आणि महामेट्रोमध्ये नोव्हेंबर २०२० मध्ये करार करण्यात आला. या प्रकल्पाच्या डीपीआरला केंद्र सरकारने नोव्हेंबरमध्येच मान्यता दिली असून, केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीत मान्यता मिळण्याची औपचारिकता राहिली आहे. मान्यता मिळाल्यानंतर प्रकल्पाला गती मिळणार आहे. प्रकल्पाचे संचालन खासगी तत्त्वावर करण्यात येणार असल्याने गुंतवणुकीसाठी अनेक उद्योजक पुढे आले आहेत.

या संकल्पनेला मूर्त स्वरूप येण्याची सुरुवात २०२० मध्ये झाली. ब्रॉडगेज मेट्रो चालविण्यासाठी उद्योजकांनी पुढे यावे, असा प्रस्ताव ठेवण्यात आला. याकरिता एमएसएमई नागपूर विभागातर्फे २१ फेब्रुवारी २०२१ ला महामेट्रोच्या एअरपोर्ट स्टेशन हॉलमध्ये झालेल्या परिषदेत नितीन गडकरी यांनी प्रकल्पाला चालना देण्यासाठी उद्योजकांनी ब्रॉडगेज मेट्रो चालवावी, असे आवाहन केले होते. आवाहनानंतर त्याचवेळी काही उद्योजकांनी मेट्रो चालविण्याची तयारी दर्शविली होती. पुढील काही वर्षांत नागपुरात वाहतुकीची समस्या भीषण होणार आहे. यावर गांभीर्याने विचार करून प्रकल्प कार्यान्वित करण्याचा प्रयत्न आहे. ऑरेंज सिटी नागपूर महाराष्ट्राची उपराजधानी असून, झिरो माईल्स हे भारताचे जिओग्राफिकल सेंटर आहे. याशिवाय शैक्षणिक आणि इंडस्ट्रीज हब असल्याने रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत. रोजगाराला गती देणाऱ्या या प्रकल्पामुळे विदर्भच नव्हे तर मध्य भारताचा विकास होणार आहे. याशिवाय पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे लोकांचा प्रवास आणि वाहतुकीच्या कोंडीवर हा प्रकल्प सर्वोत्तम पर्याय ठरणार असल्याचे मत गडकरी यांनी व्यक्त केले होते. आत्मनिर्भर भारतअंतर्गत भारतीय वॅगन उत्पादक कंपनी टीटागड वॅगन्स लिमिटेडचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक उमेश चौधरी यांनी वर्धा कॉरिडोसाठी ३६ कोटी किमतीची ट्रेन ३० कोटी रुपयात देण्याची तयारी दाखविली आहे. यासंदर्भातील पत्र त्यांनी विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश राठी यांना पाठविले आहे.

प्रकल्पात जास्तीत जास्त उद्योजकांनी गुंतवणूक करावी, या उद्देशाने विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश राठी यांच्या अध्यक्षतेखाली मोबिलिटी समिती तयार करण्यात आली. समिती आणि मेट्रो रेल्वेच्या अधिकाऱ्यांसोबत आतापर्यंत पाचवेळा बैठक घेण्यात आली आहे. ब्रॉडगेज मेट्रोचे संचालन करताना उद्योजकांना कुठे आणि कशी गुंतवणूक करायची, या प्रकल्पातून त्यांना कसा परतावा मिळेल, प्रवाशांना होणारा फायदा आणि विविध विषयांवर विस्तृत चर्चा करण्यात आली आहे. समितीची बैठक पुढील महिन्यात होणार आहे.

 

Web Title: Broadgauge Metro will fulfill the dream of Vaidarbhis; Entrepreneurs came forward

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Metroमेट्रो