बॅरिकेटिंगचे बिल काढण्यासाठी मागितली लाच; वरिष्ठ लिपिकास अटक, लेखपाल व ऑपरेटर फरार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2023 14:05 IST2023-01-20T14:04:30+5:302023-01-20T14:05:15+5:30
महादुला येथे एसीबीची कारवाई

बॅरिकेटिंगचे बिल काढण्यासाठी मागितली लाच; वरिष्ठ लिपिकास अटक, लेखपाल व ऑपरेटर फरार
कोराडी (नागपूर) : कोविड आणि दसरा उत्सवादरम्यान महादुला नगरपंचायत क्षेत्रात करण्यात आलेल्या बॅरिकेटिंगच्या कामाचे बिल काढून देण्यासाठी २६ हजार ५०० रुपयांची लाच मागणाऱ्या नगरपंचायतीच्या वरिष्ठ लिपिकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) अटक केली आहे.
ही कारवाई गुरुवारी सायंकाळी ५.३० वाजता महादुला येथे करण्यात आली. अशोक शामरावजी कुथे (वय ४५) रा. बजरंग नगर, हनुमान मंदिर जवळ, महादुला असे अटक करण्यात आलेल्या लिपिकाचे नाव आहे. याशिवाय लेखापाल मयूर रवींद्र धोटे (३२) रा. एलेक्सिस हाॅस्पिटलमागे, मानकापूर आणि कंत्राटी संगणक ऑपरेटर रितेश शिंदे (३२) रा. कन्हान अशी फरार आरोपींची नावे आहेत.
कंत्राटदार असलेल्या तक्रारदाराने कोविड आणि दसरा उत्सव-२०२२ दरम्यान महादुला नगरपंचायत क्षेत्रात केलेल्या बॅरिकेट्सच्या कामाचे ८० हजार आणि ३० हजारांसह इतर कामाचे बिल नगर पंचायत कार्यालयात मंजुरीसाठी सादर केले होते. बिल मंजूर करून घेण्यासाठी तो प्रयत्नरत होता. मात्र, त्यात सातत्याने वरिष्ठ लिपिक असलेले अशोक कुथे चुका काढत असल्याची बाब कंत्राटदाराच्या निदर्शनास आली होती. यानंतर त्यांनी कुथे यांची भेट घेतली. यावरून त्यांनी २० हजारांची मागणी केली. मात्र, त्यापूर्वी ते बिल लेखापाल आणि संगणक ऑपरेटरकडून जात असल्याने लेखापालाने ५ हजार, तर ऑपरेटरने दीड हजारांची लाच मागितली. त्यामुळे त्यांनी याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविली होती होती.
उपरोक्त तिघांना २१ हजार ५०० रुपये देण्याचे ठरले होते. त्यानुसार गुरुवारी सायंकाळी ५.३० वाजता सापळा रचण्यात आला. ठरल्याप्रकरणी कंत्राटदाराने पैसे देताच, पथकाने वरिष्ठ लिपिकाला रंगेहात अटक केली. मात्र, त्यापूर्वीच लाच मागणारे लेखापाल आणि ऑपरेटर फरार झाले. रात्री उशिरापर्यंत पोलिस त्यांचा शोध घेत होते. उपरोक्त कारवाई पोलिस उपअधीक्षक अनामिका मिर्झापुरे यांच्या नेतृत्वात पोलिस निरीक्षक प्रवीण लाकडे, प्रीती शेंडे, शिपाई सारंग बालपांडे, अस्मिता मेश्राम, करुणा सहारे, अमोल भक्ते यांच्या पथकाने केली.