श्वास थांबला होता, पण जिद्द कायम ! तरुणीने ‘जीबीएस’वर केली यशस्वी मात
By सुमेध वाघमार | Updated: October 6, 2025 19:37 IST2025-10-06T19:31:19+5:302025-10-06T19:37:00+5:30
व्हेंटिलेटरवर ४२ दिवसांचा संघर्ष यशस्वी : मेडिकलच्या डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश

Breathing was stopped, but determination remained! Young woman successfully defeated 'GBS'
नागपूर : गुलियन-बॅरे सिंड्रोम’ (जीबीएस) या दुर्मिळ आणि जीवघेण्या आजाराने जेव्हा शरीराच्या मज्जातंतूंवर हल्ला केला, तेव्हा एका ३३ वर्षीय तरुणीची स्थिती क्षणाक्षणाला खालावत गेली. तिला पूर्णपणे अर्धांगवायू (पक्षाघात) झाला आणि श्वासही घेण्यासाठी कृत्रिम श्वासोच्छ्वास यंत्रणेची (व्हेंटिलेटरची) गरज भासली. श्वास घेण्यासाठी सुरू झालेला हा संघर्ष तब्बल सलग ४२ दिवस चालला. कुटुंबीयांनी सारी आशा सोडली होती, पण मेडिकलच्या मेडिसीन विभागातील डॉक्टरांनी मात्र हार मानली नव्हती. त्यांच्या अथक प्रयत्नांची पराकाष्ठा, योग्य वेळी दिलेले विशेष उपचार आणि नियमित फिजिओथेरपी यामुळे अखेर या तरुणीने मृत्यूवर विजय मिळवला. आज, सोमवार रोजी तिला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला, तेव्हा तिच्या चेहऱ्यावर नव्या आयुष्याचा आनंद आणि डॉक्टरांंप्रति कृतज्ञतेचा भाव मन हेलावून टाकणारा होता.
मौदा तालुक्यातील एका छोट्याश्या गावातील ‘शर्मिला’ या तरुणीला तिच्या नातेवाइकांनी २७ जुलै रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) आकस्मिक विभागात दाखल केले. गेल्या दोन दिवसांपासून तिला दोन्ही हात व पायांमध्ये अशक्तपणा जाणवत होता. सुरुवातीला बोटांमध्ये आणि नंतर हळूहळू हा अशक्तपणा शरीराच्या मध्यभागाकडे वाढत गेला. या लक्षणांमुळे डॉक्टरांना लगेचच ‘जीबीएस’ या आजाराचा संशय आला. रुग्णाला तातडीने वैद्यकीय अतिदक्षता विभागात (आयसीयू) दाखल केले. तपासणीत तिचे दोन्ही हात व पाय लुळे पडले होते. उपचारासाठी त्वरित ‘इंट्राव्हेनस इम्युनोग्लोब्युलिन’ हे औषध पाच दिवसांसाठी सुरू करण्यात आले. दुर्देवाने, उपचाराच्या दुसºया दिवशीपासून तिला श्वास घेण्यासही त्रास होऊ लागला. त्यामुळे तिला इन्ट्युबेट करून व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. त्यानंतर श्वास घेण्यासाठी ‘ट्रॅकिओस्टॉमी’ देखील करण्यात आली. ‘नर्व्ह कंडक्शन स्टडीज’च्या चाचणीत तिला जीबीएसचा 'अक्यूट मोटर अॅक्सोनल न्यूरोपॅथी' हा उपप्रकार असल्याचे निदान झाले.
उपचार सुरू असताना न्यूमोनिया
‘शर्मिला’वर उपचार सुरू असताना हेंटिलेटर-संबंधित न्यूमोनिया सारख्या गुंतागुंतीचाही सामना करावा लागला. त्यामुळे, रुग्णाला ‘प्लाज्माफेरेसिस’चे पाच चक्र देण्यात आले. या उपचारांनंतर तिच्या मज्जासंस्थेमध्ये सुधारणा होण्यास सुरुवात झाली.
हा वैद्यकीय चमत्कार डॉक्टरांच्या निष्ठेचे प्रतीक
अडीच महिन्याच्या उपचारानंतर सोमवार, ६ आॅक्टोबर रोजी तिला मेडिकलमधून सुटी देण्यात आली, तेव्हा ती स्वत:च्या पायावर उभी होती. हा वैद्यकीय चमत्कार तिच्या जिद्दीचे आणि डॉक्टरांच्या निष्ठेचे प्रतीक आहे. तिच्यावरील उपचारामध्ये मेडिकलच्या मेडिसीन विभागाचे प्रमुख डॉ. अतुल राजकोंडावार, डॉ. मिलिंद व्यवहारे, डॉ. अर्चना अहेर, डॉ. विनय मेश्राम, डॉ. जे. भगत, डॉ. सारांश बराई यांच्यासह निवासी डॉक्टर निरज तितरमारे, डॉ. रिषभ जैन, डॉ. आयुष ठाकूर, डॉ. बरारीया खान, डॉ. मृणाल पाथराडकर व डॉ. शिरीन यांच्यासह परिचारिकांची महत्त्वाची भूमिका होती.