‘आलिशान’शी संबंधित प्रतिष्ठानात सापडलेले ‘बंधूआ मजदूर’च ! वेठबिगारीचे कलम लावणार
By नरेश डोंगरे | Updated: February 6, 2026 21:01 IST2026-02-06T21:00:08+5:302026-02-06T21:01:19+5:30
बाल कल्याण समितीकडून पोलिसांना आदेश : वेठबिगारीचे कलम लावणार : आलिशानही अडचणीत येण्याची शक्यता

'Bonded' workers found in 'luxury' related establishment! Will be charged with forced labour
नरेश डोंगरे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बिहार मधील अल्पवयीन मुलांना नागपुरात एका ठिकाणी ठेवून त्यांच्याकडून जबरदस्तीने काम करवून घेतल्याच्या प्रकरणाने आज वेगळे वळण घेतले. बाल कल्याण समितीने या प्रकरणाची गंभिर दखल घेऊन 'त्या' अल्पवयिन मुलांना 'बंधूआ मजदूर' म्हणून काम करवून घेणाऱ्याविरुद्ध ठोस कारवाई करण्याचे आदेश दिले. दरम्यान, ज्या ठिकाणी या मुलांना वेठबिगार म्हणून ठेवले होते, त्या ठिकाणाच्या मालकाचा थेट 'आलिशान'सोबत संबंध असल्याने आलिशानच्या मालकाचीही पोलिस चाैकशी करीत आहेत.
जिल्हा महिला व बालविकास विभाग, कामगार विभाग आणि जिल्हा बाल संरक्षण विभागाच्या पथकाने गुरुवारी, ५ फेब्रुवारीला इतवारी (गांधीबाग) येथील नाशिर क्रिएशन्समध्ये संयुक्तपणे छापा टाकला. तेथे बंधुआ मजदूर म्हणून काम करणाऱ्या सहा बालकांसह अनेकांना ताब्यात घेतले. छापा पडलेल्या ठिकाणी बालमजुरांना रात्रंदिवस वेठीस धरून त्यांच्याकडून रात्रंदिवस कपडे शिवून घेण्याचे तसेच इतर काम करवून घेतले जात होते. तयार झालेला हा कपड्याचा माल ‘आलिशान’मध्ये जात होता. संबंधित पथकाने या कारवाईचे व्हिडीओ शुटिंग करवून घेतले आणि मुलांना विश्वासात घेऊन त्यांची चाैकशी केल्यानंतर या बालकांना 'बंधूआ मजदूर' म्हणूनच वापरले जात होते, असे चाैकशीत स्पष्ट झाल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी पोलिसांना सांगितले. तशी तक्रारही तहसील पोलिस ठाण्यात गुरुवारी रात्री नोंदवली. पोलिसांनी मात्र या प्रकरणात केवळ नासिर क्रिएशन्सचा मालक मोहम्मद नासिर अन्सारी (वय २८, रा. निकालस मंदीर रोड, इतवारी) याच्याविरुद्ध गुन्हे दाखल केले.
वेठबिगारीचे कलम लावणार
आलिशान कपड्याच्या दुकानातून/फॅक्टरीतून सोडविण्यात आलेल्यांपैकी २ बालके केवळ १३ वर्षांचे, दोन १६ तर दोन मुले १७ वर्षांची आहेत. बिहारमधील भागलपूर जिल्ह्यातून त्यांना चांगल्या पैशाचे आणि सुखसोयीचे आमिष दाखवून नागपुरात आणण्यात आले. मात्र, येथे त्यांना ‘बंधूआ मजदुरां’सारखे ठेवण्यात आल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले. त्यांना आवश्यक सोयीसुविधा दिल्या जात नव्हत्या, अशीही संतापजनक माहिती पुढे आली. मात्र, पोलिसांनी तशा प्रकारचा गुन्हा (कलम) लावलेल नसल्याने आज बाल कल्याण समितीने त्याची गंभीर दखल घेतली. या प्रकरणात वेठबिगारीचे कलम लावण्याचे आदेश तहसील पोलिसांना दिले. त्यानुसार, आता या प्रकरणात वेठबिगारीचे कलम लावले जाणार असल्याचे तहसीलचे ठाणेदार संजय मेंढे यांनी पत्रकारांना सांगितले.
बड्या माशांची धावपळ
हे गंभीर प्रकरण आपल्यावर येणार असल्याचे कळताच आलिशानच्या मालकासह काहींनी गुरुवारी सायंकाळपासून मोठी धावपळ सुरू केली. पोलिसांना दूर ठेवण्यासाठी मध्यरात्रीपर्यंत 'त्यांच' प्रयत्न सुरू होते, अशी गांधीबागेत चर्चा आहे. दरम्यान, या प्रकरणात पीडितांना न्याय देण्यासाठी शासकीय यंत्रणा ठोस कारवाई करणार असल्याचे जिल्हा बाल संरक्षण अधिकारी मुश्ताक पठाण यांनी सांगितले. तर, आलिशानच्या संचालकांचा या प्रकरणात काय संबंध आहे, त्याची चाैकशी केली जात असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय मेंढे यांनी दिली. त्यामुळे संबंधित वर्तुळात धावपळ वाढली आहे.