बोगस मुख्याध्यापक नियुक्ती भोवली; संस्था चालक ताब्यात; वाढदिवशी केली कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2025 12:42 IST2025-06-07T12:42:15+5:302025-06-07T12:42:41+5:30

‘शालार्थ आयडी’त सहभागी; एसआयटीही चौकशीस बोलावण्याची शक्यता

Bogus principal appointment made in Bhowli; Institution driver detained; Action taken on birthday | बोगस मुख्याध्यापक नियुक्ती भोवली; संस्था चालक ताब्यात; वाढदिवशी केली कारवाई

बोगस मुख्याध्यापक नियुक्ती भोवली; संस्था चालक ताब्यात; वाढदिवशी केली कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: बोगस दस्तावेजांच्या आधारे मुख्याध्यापक नियुक्तीच्या प्रकरणात पोलिसांना आणखी एक यश मिळाले. या घोटाळ्यात सहभागी  संस्थाचालकाला पोलिसांनी भंडारा येथून गुरुवारी रात्री ताब्यात घेतले. प्रकृतीच्या कारणावरून संस्थाचालकाला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. शालार्थ आयडी घोटाळ्यातही एसआयटीकडून संस्थाचालकांवर संक्रांत येण्याची शक्यता आहे.

चरण नारायण चेटुले (६३, भंडारा) असे संबंधित संस्थाचालकाचे नाव आहे. चेटुले भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर येथे राजश्री शिक्षण संस्था व नवोदय शिक्षण संस्था या दोन संस्थांमध्ये अध्यक्ष आहे. आरोपी मुख्याध्यापक पराग पुडके याने नागपूर येथील एस.के.बी. उच्च प्राथमिक, माध्यमिक विद्यामंदिर यादवनगर या शाळेची बोगस व बनावट कागदपत्रे तयार करून उपसंचालक उल्हास नरड यांनी आर्थिक व्यवहार करून चुकीच्या पद्धतीने राजश्री शिक्षण संस्थेच्या शाळेत मुख्याध्यापक पदासाठी मंजुरी दिली.

मुन्ना वाघमारे यांच्या तक्रारीनंतर हा प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी पुडके, उपसंचालक उल्हास नरड यांच्यासह सात जणांना ताब्यात घेतले होते. या प्रकरणात पुडकेच्या कागदपत्रांवर चोटुलेची स्वाक्षरी होती. पोलिसांनी गुरुवारी रात्री भंडाऱ्यातून चेटुलेला ताब्यात घेतले.  पोलिसांनी न्यायालयासमोर पोलिस कोठडीची मागणी केली आहे.

वाढदिवसाच्या दिवशीच केली कारवाई

चरण चेटुले यांचा गुरुवारी वाढदिवस होता व त्याच दिवशी ताब्यात घेण्यात आले. याअगोदर पोलिसांनी राजू केवलराम मेश्राम या एका संस्था सचिवालादेखील अटक केली होती. दरम्यान, शालार्थ आयडी घोटाळ्यात सहभागी असलेले काही संस्थाचालक अस्वस्थ झाले. त्यांना ‘एसआयटी’कडून लवकरच चौकशीला बोलविण्यात येणार आहे. अनेक संस्थाचालकांपर्यंत ही माहिती जाताच त्यांचे धाबे दणाणले आहेत.

Web Title: Bogus principal appointment made in Bhowli; Institution driver detained; Action taken on birthday