नागपुरात दाम्पत्याच्या बॅगमध्ये आढळला पुरुषाचा मृतदेह, सतर्क रिक्षाचालकामुळे गुन्हा झाला उघड
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2017 15:21 IST2017-10-16T08:43:28+5:302017-10-16T15:21:30+5:30
तरुण-तरुणीच्या बॅगमध्ये पुरुषाचा मृतदेह आढळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नागपुरातील माटे चौकातील ही घटना आहे.

नागपुरात दाम्पत्याच्या बॅगमध्ये आढळला पुरुषाचा मृतदेह, सतर्क रिक्षाचालकामुळे गुन्हा झाला उघड
नागपूर : एका व्यक्तीची हत्या करून त्याचा मृतदेह सुटकेसमध्ये भरल्यानंतर सुटकेस फेकून देण्यासाठी एक जोडपे रेल्वे स्थानकाकडे निघाले. मात्र, ऑटोचालकाला संशय आल्यामुळे आरोपी जोडपे पळून गेले आणि पोलिसांना या खळबळजनक प्रकरणाची माहिती मिळाली. प्रतापनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला.
ऑटोचालक विनोद सावंत सोनडवले (वय ४५, रा. विजयनगर) सोमवारी (16 ऑक्टोबर) पहाटे 2.40 वाजता प्रतापनगरातील दुर्गा माता मंदिराजवळ होते. यालेळी त्यांना भली मोठी सुटकेस घेऊन आलेल्या एका दाम्पत्याने रेल्वे स्थानकावर जायचे आहे, असे सांगितले. त्यानुसार, या दोघांना घेऊन सोनडवले रेल्वेस्थानकाकडे निघाले. सुटकेसमधून दुर्गंधी येत असल्यामुळे त्यांना संशय आला. त्यामुळे त्यांनी लघुशंकेचा बहाणा करून माटे चौकाजवळ ऑटो थांबवली. ते बाजूला जाऊन फोनवर बोलत असल्याचे पाहून ऑटोतील दाम्पत्याला संशय आला.
त्यामुळे त्यांनी ऑटोतून पळ काढला. ऑटोचालक सोनडवलेने सरळ प्रतापनगर पोलिसांना सुटकेस दाखवली. ती उघडून बघितली असता त्यात एकाचा मृतदेह आढळला. आरोपी दाम्पत्य सुटकेसमधील मृतदेह रेल्वेतून फेकून पुरावा नष्ट करण्याच्या तयारीत असल्याचे स्पष्ट झाले.
मृताची ओळख पटली
प्रतापनगरचे ठाणेदार शिवाजीराव गायकवाड, एपीआय सचिन शिर्के आणि त्यांच्या सहका-यांनी चौकशीची सूत्रे फिरवली. त्यानंतर मृत व्यक्ती मानसिंग कुंवरसिंग शिव (वय ५५) असल्याचे स्पष्ट झाले. मानसिंगचा खून कुणी केला त्याची चौकशी करण्यासाठी पोलिसांनी त्याच्या पत्नीला ताब्यात घेतले. त्यानंतर घरगुती वादातून मानसिंगची हत्या करून मृतदेह सुटकेसमध्ये भरल्यानंतर तो रेल्वेतून फेकून देण्यासाठी त्याची मुलगी आणि जावई रेल्वेस्थानकाकडे निघाल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी मानसिंग यांच्या पत्नीला अटक करण्यात आली असून आरोपी जावई फरार आहे. या दोन्ही आरोपींनी मृतदेह घेऊन जाण्यासाठी एका दुकानातून बॅग विकत घेतली होती. त्याचे सीसीटीव्ही पोलिसांच्या हाती लागले असून दोन्ही आरोपी बॅग विकत घेत असल्याचे यात दिसत आहे.