रेशनच्या धान्याची होणारा काळाबाजार उघड; लोकमतच्या बातमीमुळे हिवाळी अधिवेशनात मुद्दा गाजणार
By नरेश डोंगरे | Updated: December 4, 2025 20:38 IST2025-12-04T20:37:23+5:302025-12-04T20:38:26+5:30
Nagpur : ‘लोकमत’ने रेशनच्या धान्याची होणारा काळाबाजार उघड करणारी वृत्तमालिका प्रकाशित केल्यानंतर काँग्रेसचे गटनेते विजय वडेट्टीवार यांनी या संबंधाने लक्षवेधी दाखल केली आहे. त्यामुळे हा मुद्दा येत्या हिवाळी अधिवेशनात गाजणार आहे.

Black marketing of ration grains exposed; Lokmat news will make the issue a hot topic in the winter session
नरेश डोंगरे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘लोकमत’ने रेशनच्या धान्याची होणारा काळाबाजार उघड करणारी वृत्तमालिका प्रकाशित केल्यानंतर काँग्रेसचे गटनेते विजय वडेट्टीवार यांनी या संबंधाने लक्षवेधी दाखल केली आहे. त्यामुळे हा मुद्दा येत्या हिवाळी अधिवेशनात गाजणार आहे. एवढेच नव्हे तर गोरगरीबाच्या ताटावर परस्पर हात मारून त्यांच्या हक्काचा घास हिसकावून घेणाऱ्या पुरवठा विभागातील भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कडक कारवाईचे संकेत मिळाल्याने संबंधित वर्तुळात मोठी खळबळ निर्माण झाली आहे.
महागाईने होरपळून निघालेल्या गोरगरीब आणि निराधार व्यक्तींना दोनवेळेला पोटाची खळगी भरता यावी यासाठी राज्य सरकार स्वस्त धान्य दुकानाच्या माध्यमातून मोफत धान्य पुरवठा करते. मात्र, वितरण प्रणाली सुरळीत ठेवण्याची जबाबदारी असलेल्या यंत्रणेतील काही घुसखोर गोरगरिबांच्या हक्काचे धान्य मध्येच लंपास करतात. नागपूर, विदर्भातील अनाज माफियांना हाताशी धरून ही मंडळी सरकारी धान्याची काळाबाजारी करून महिन्याला कोट्यवधींचा गोलमाल करीत असल्याचे वृत्त कानावर येताच ‘लोकमत’ने अन्न पुरवठा विभागाचा घोळ उघड केला. '१५ ते १८ ऑक्टोबर दरम्यान
गरिबाच्या हक्काचे अन्न ओरबडतेय भ्रष्ट यंत्रणा, कंची मारलेला तांदूळ बाजारात, महिन्याला १३०० पोती धान्य गायब' अशी वृत्त मालिका प्रकाशित करून खळबळ उडवून दिली. त्याची मंत्रालयातून तसेच जिल्हाधिकाऱ्यांकडून गंभीर दखल घेण्यात आली. संबंधित अधिकाऱ्यांची खरडपट्टीही काढण्यात आली. मात्र, संबंधित अधिकाऱ्यांनी तेवढ्यापुरते ऐकल्यासारखे केले. नंतर पुन्हा काळाबाजारी सुरू झाली. त्यामुळे पोलिसांनी धान्य तस्करांच्या ठिकठिकाणच्या गोदामावर छापे मारले. वितरण प्रणालीतील अधिकाऱ्यांनी त्यालाही दाद दिली नसल्याची खुद्द पोलिसांची कुजबुज असल्यामुळे 'लोकमत'ने पुन्हा 'रेशन माफियांकडे छापे, वितरण अधिकाऱ्यांची संशयास्पद तटस्थता (२२ नोव्हेंबर), धान्य तस्करांना मिळतेय अधिकाऱ्यांकडून संरक्षण (१ डिसेंबर)' अशा मथळ्याचे वृत्त प्रकाशित केले. विविध सामाजिक संघटना त्यासंबंधाने रोष व्यक्त करीत संबंधितांना निवेदने देऊन कडक कारवाईची मागणी केली. या पार्श्वभूमीवर, काँग्रेसचे गटनेते विजय वडेट्टीवार यांनी या संबंधाने लक्षवेधी दाखल करून या गंभीर प्रकराला कोण जबाबदार आहेत, त्यांच्यावर काय कारवाई केली, कारवाई न करण्यामागचे कारण काय, असे प्रश्न उपस्थित केले आहे.
८ डिसेंबर २०२५ पासून नागपुरात हिवाळी अधिवेशनाला प्रारंभ होत आहे. यात ही लक्षवेधी गाजणार असून, संबंधित भ्रष्टाचाऱ्यांवर कारवाईचे संकेत मिळाले आहे.
अधिकाऱ्यांची धावपळ
उपायुक्त अन्न व पुरवठा नागपूर यांनी अव्वल कारकून आणि कारकून पदाच्या झालेल्या बदल्यातही भ्रष्टाचार झाल्याचा मुद्दा या लक्षवेधीत आहे. हे दोन्ही मुद्दे हिवाळी अधिवेशनात तापू शकतात, हे लक्षात आल्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी धावपळ चालविली आहे.