ब्लॅक गोल्डचे ब्लॅक मार्केटिंग : 'देखरेखदाराच्या डोळ्यांवर नोटांचे झापडं'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2021 12:52 PM2021-10-22T12:52:30+5:302021-10-22T13:03:15+5:30

कोलमाफियांनी सरकारी यंत्रणा अन् काही कोळसा खदानीच्या ' काही भ्रष्ट देखरेखदारांच्या डोळ्यांवर नोटांची झापडं' बांधली आहेत. त्यामुळे काही खदानीत (डीओ) ऑर्डर एका मालाची अन् उचल दुसऱ्याची, असा धक्कादायक प्रकार सुरू आहे.

Black Marketing of Black Gold nagpur series part 3 | ब्लॅक गोल्डचे ब्लॅक मार्केटिंग : 'देखरेखदाराच्या डोळ्यांवर नोटांचे झापडं'

ब्लॅक गोल्डचे ब्लॅक मार्केटिंग : 'देखरेखदाराच्या डोळ्यांवर नोटांचे झापडं'

Next
ठळक मुद्देअधिकारी, कर्मचारी अन् ट्रान्स्पोर्टरची कमाल : डीओ चुरीचा अन् काढला जातो बडा माल‘लोकमत’च्या वृत्तामुळे माफिया अलर्ट मोडवर

नरेश डोंगरे

नागपूर : कोळशाच्या दलालीत हात काळे, अशी एक म्हण प्रचलित आहे. मात्र, वर्षानुवर्षांपासून ऐकविल्या जाणाऱ्या या म्हणीला कोलमाफियांनी खोटी ठरविले आहे. ‘कोळशाच्या दलालीत सारेच मालामाल’, अशी नवीन म्हण कोलमाफियांनी आता प्रचलित केली आहे.

कोलमाफियांनी सरकारी यंत्रणा अन् काही कोळसा खदानीच्या ' काही भ्रष्ट देखरेखदारांच्या डोळ्यांवर नोटांची झापडं' बांधली आहेत. त्यामुळे काही खदानीत (डीओ) ऑर्डर एका मालाची अन् उचल दुसऱ्याची, असा धक्कादायक प्रकार सुरू आहे. कोळसा तस्करीची येथूनच सुरुवात होते अन् कोलमाफियांना लबालब करणारा हाच पहिला टप्पा आहे.

ज्या कंत्राटदारांना खदानीतून कोळसा उचलण्याचा आणि वाहतूक करण्याचा परवाना मिळतो, त्यातील काही (सर्वच नाही) कंत्राटदार बंद पडलेल्या कंपन्या, कारखाने यांच्या नावाने डीओ अर्थात कोळसा मिळवण्याचा पास (परवाना) घेतात. काही भ्रष्ट अधिकाऱ्यांशी संगनमत असल्याने त्यांच्या माध्यमातून हलक्या दर्जाचा कोळसा अर्थात चुरी (बारीक) कोळसा उचलण्याची पास असताना बडा (मोठा) कोळसा उचलतात. त्यासाठी भ्रष्टाचाऱ्यांच्या हातात प्रतिटन शंभर ते दीडशे रुपये लाच ठेवली जाते. नंतर हाच कोळसा बाहेर प्रतिटन अडीच ते तीन हजार रुपये जास्त भाव घेऊन विकला जातो. नागपूर जिल्ह्यातील विविध खाणींतून दर दिवशी शेकडो टन कोळसा बाहेर काढला जातो. त्यात चुरीऐवजी मोठा कोळसा बाहेर काढून विकण्याचे प्रमाण १० टक्के धरले तरी तो हिशेब सरासरी २० ते ३० लाख रुपयांच्या घरात जातो. सध्या टंचाईची ओरड असल्याने कोलमाफिया तसेच त्यांनी निर्माण केलेले रॅकेट कोळशाची ब्लॅकमार्केटिंग करून खोऱ्यांनी नोटा ओढत असल्याची संबंधित वर्तुळात चर्चा आहे.

‘लोकमत’च्या वृत्तामुळे माफिया अलर्ट मोडवर

‘ब्लॅकगोल्डचे सुरू असलेले ब्लॅकमार्केटिंग’ उघड करणारी मालिका ‘लोकमत’ वृत्तसमूहाने लावून धरल्याने कोलमाफिया तसेच कोळशाच्या दलालीत बरबटलेले भ्रष्टाचारी अलर्ट मोडवर आले आहेत. हे रॅकेट चालविणारे आणि ‘काला पत्थर से खेलनेवाले मगरमच्छ’ म्हणून कुपरिचित असलेले दिलीप, कैलास, चेतन, पांडे, ठाकूर, जेके, जैन आणि त्यांच्या साथीदारांनी दलालांच्या माध्यमातून काही पत्रकबाजांशी संपर्क साधला. काय करायचे, कसे करायचे, त्याबाबत विचारमंथन करून त्यांनी कारवाई कशी टाळायची, याबाबतही दलालांची भूमिका वठविणाऱ्यांशी चर्चा केल्याची खास सूत्रांची माहिती आहे. विशेष म्हणजे, काही दलालांनी ‘मै हूँ ना’, असा शब्द देत कोलमाफियांना आश्वस्त करण्याचा निर्ढावलेपणाही दाखविल्याची चर्चा आहे.

गृहमंत्र्यांच्या कानावर जाणार ब्लॅक मार्केटिंग

कोळशाचे उघड-उघड ब्लॅकमार्केटिंग तसेच भेसळ होत असताना संबंधित यंत्रणा धडक कारवाई करण्याऐवजी त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याची भावना झाल्याने अनेक पक्ष आणि संघटना आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. आज, शुक्रवारी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील नागपुरात आहेत. त्यांच्याही कानांवर हा प्रकार घातला जाणार आहे. दरम्यान, शिवसेनेचे उत्तर नागपूर माजी विधानसभा संघटक सुनील बॅनर्जी यांनी गुरुवारी माईन्सचे अधिकारी आणि पोलीस आयुक्तांना एक निवेदन दिले आहे.

कोळसा टंचाईमुळे वीजनिर्मिती आणि अनेक छोटे उद्योग संकटात सापडले असताना कोलमाफियांकडून सुरू असलेली कोळशाची चोरी, भेसळ अन् काळाबाजारी तत्काळ बंद करा, संबंधितांवर कडक कारवाई करा, अशी मागणी त्यांनी निवेदनातून केली असून कोलमाफियांकडून कारवाई झाली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही बॅनर्जी यांनी दिला आहे.

Web Title: Black Marketing of Black Gold nagpur series part 3

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app