कळमेश्वरात भाजपचा स्वबळाचा नारा, महाविकास आघाडीत जागा वाटपावर पेच
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2025 17:19 IST2025-11-07T17:18:32+5:302025-11-07T17:19:59+5:30
Nagpur : मागील विधानसभा निवडणुकीत झालेल्या यशस्वी समन्वयामुळे आणि विजयाच्या पार्श्वभूमीवर भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. काही प्रभागांमध्ये किरकोळ नाराजी असली, तरी वरिष्ठ नेत्यांच्या हस्तक्षेपामुळे त्यावर तोडगा निघेल, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

BJP's slogan of self-reliance in Kalmeshwar, dilemma over seat allocation in Mahavikas Aghadi
लोकमत न्यूज नेटवर्क
कळमेश्वर : नगर परिषद निवडणुकीचा बिगुल वाजताच कळमेश्वर-ब्राह्मणी शहरात राजकीय वातावरण तापले आहे. भाजपाने स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय जवळपास निश्चित केला आहे, तर दुसरीकडे महाविकास आघाडीत जागा वाटपावरून चर्चा आणि मतभेद सुरू असल्याने गोंधळाचे वातावरण आहे.
मागील विधानसभा निवडणुकीत झालेल्या यशस्वी समन्वयामुळे आणि विजयाच्या पार्श्वभूमीवर भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. काही प्रभागांमध्ये किरकोळ नाराजी असली, तरी वरिष्ठ नेत्यांच्या हस्तक्षेपामुळे त्यावर तोडगा निघेल, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
भाजपाकडून ३० टक्के माजी नगरसेवकांना आणि ७० टक्के नव्या कार्यकर्त्यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याची चर्चाही राजकीय वर्तुळात आहे. दरम्यान, महाविकास आघाडीत मात्र अजूनही जागा वाटपावर एकमत झालेले नाही. काँग्रेस, उद्धवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष या तिन्ही पक्षांमध्ये जागा वाटपावरून चर्चेचे गुऱ्हाळ रंगले आहे. स्थानिक स्तरावर काँग्रेस नगराध्यक्ष पदासाठी आणि जास्त जागांसाठी आग्रही आहे, तर उद्धवसेना स्वबळावर ताकद आजमावण्याच्या तयारीत असल्याचे संकेत आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसची चर्चादेखील काँग्रेसकडून सुरू असून, यामुळे महाविकास आघाडीच्या बैठकीतून अद्याप ठोस निर्णय समोर आलेला नाही. राजकीय समीकरणांमध्ये एकीकडे भाजपाचे पाऊल स्थिरावत असताना, दुसरीकडे महाविकास आघाडीतील मतभेदांमुळे राजकारण अधिक रंगणार असल्याचे संकेत मिळत आहेत. आगामी दोन ते तीन दिवसात आघाडीचे चित्र स्पष्ट होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
दरम्यान, आचारसंहिता लागू झाल्याने शहरातील विकासकामांना तात्पुरता अडथळा निर्माण झाला असला, तरी सर्वच पक्ष आता मर्यादित वेळेत मतदारांना आकर्षित करण्यासाठी संपर्क मोहिमा, प्रचाराचे नियोजन आणि जनसंवादाचे उपक्रम राबविणार आहेत.