मंत्री, पदाधिकाऱ्यांप्रमाणेच भाजपच्या कार्यकर्त्यांनाही शंभर दिवसांचे 'टार्गेट'

By योगेश पांडे | Updated: June 4, 2025 12:53 IST2025-06-04T12:52:28+5:302025-06-04T12:53:03+5:30

प्रत्येक कार्यकर्ता : पदाधिकाऱ्याला 'कमळ' चिन्ह लावावे लागणार

BJP workers, like ministers and office bearers, also have a 100-day 'target' | मंत्री, पदाधिकाऱ्यांप्रमाणेच भाजपच्या कार्यकर्त्यांनाही शंभर दिवसांचे 'टार्गेट'

BJP workers, like ministers and office bearers, also have a 100-day 'target'

योगेश पांडे 
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने निष्क्रिय कार्यकर्त्यांना सक्रिय करण्यासाठी नियोजन केले आहे. राज्यात मंत्री व प्रशासनातील अधिकाऱ्यांना शंभर दिवसांचा कृती कार्यक्रम देण्यात आला होता. त्याच पार्श्वभूमीवर भाजप कार्यकर्त्यांनाही शंभर देण्यात येत आहे. निवडणुकीपर्यंत जो मार्ग मिळेल, त्याने पक्षाचे हरत-हेने शक्तिप्रदर्शन करावे, असे पदाधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले आहेत. तसेच प्रत्येक कार्यकर्ता - पदाधिकाऱ्याने 'कमळ' चिन्ह लावून फिरावे. त्यातून वातावरणनिर्मिती करावी, असे पक्षाकडून सांगण्यात आले आहे.


नागपुरात मंगळवारी विदर्भविभागीय कार्यशाळा पार पडली. या कार्यशाळेत विदर्भातील ३० मंडळांतील पदाधिकारी उपस्थित होते. कार्यकारी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी यावेळी पक्षाच्या धुरिणांनी आखलेले नियोजन या पदाधिकाऱ्यांसमोर मांडले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काहीही करून भाजप क्रमांक एकचा पक्ष राहिला पाहिजे. त्या १०० दिवसांचा संघटनात्मक कार्यक्रम आखण्यात आला आहे. अगदी सुक्ष्म पातळीवर जाऊन लोकांशी संपर्क साधावा. तसेच प्रत्येक बूथवरील पदाधिकाऱ्यांना त्यांच्या जबाबदारीचे वाटप आत्ताच करण्यात यावे, अशा सूचना पदाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.


'कमळ' चिन्हाच्या 'मार्केटिंग'वर भर
भाजपकडून पुढील काही कालावधीत पक्षाचे चिन्ह असलेल्या 'कमळ'च्या मार्केटिंगवर भर देण्यात येणार आहे. पक्षाच्या बूथपातळीपासून ते राज्य पातळीपर्यंतच्या कार्यकर्त्यापर्यंत सर्वांनीच शर्ट किंवा साडीवर 'कमळ' चिन्ह लावूनच घराबाहेर निघावे, अशी सूचना देण्यात आली आहे. 'कमळ' चिन्हाबाबत वातावरणनिर्मिती व्हावी, यासाठी पक्षाच्या धुरिणांनी हे नियोजन केले आहे.


पक्षाच्या मार्केटिंगसाठी होर्डिंग-बॅनरबाजी करा
१०० दिवसांत राज्यभरात भाजपचीच चर्चा राहिली पाहिजे, यावर पक्षनेत्यांचा भर आहे. त्यामुळेच जनतेपर्यंत जास्तीत जास्त प्रमाणात भाजपचीच चर्चा राहावी, या दृष्टीने पदाधिकाऱ्यांना नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पक्षाचे काहीही करून शक्तिप्रदर्शन झाले पाहिजे. त्यासाठी आवश्यक वाटले तर होर्डिंग लावा किंवा बॅनरबाजी करा. मात्र, पक्षाचे योग्य मार्केटिंग झालेच पाहिजे, असे निर्देश चव्हाण यांनी दिले आहेत.


'बूथ मॅपिंग' करण्याची सूचना
विधानसभा निवडणुकीत भाजपला बऱ्याच बूथवर अपेक्षित यश मिळाले नव्हते. अशा बूथवर कार्यकर्ते जोडून 'बूथ मॅपिंग' करण्याचे 'टार्गेट' पदाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. पक्षाकडे प्रत्येक मंडळातील बूथची 'अपडेटेड' माहिती आहे. विदर्भातील जिल्हाध्यक्षांना मंगळवारी तो सविस्तर 'डेटा' सोपविण्यातही आला असल्याची माहिती पक्षाच्या सुत्रांनी दिली.

Web Title: BJP workers, like ministers and office bearers, also have a 100-day 'target'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.