नागपुरात निकालापूर्वीच भाजपचा नगराध्यक्ष घोषित ? आचारसंहिता भंग केल्याचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2025 15:08 IST2025-12-17T15:07:55+5:302025-12-17T15:08:55+5:30
Nagpur : मनोज कोरडे यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय चरडे यांचा आचारसंहिता भंगाचा आरोप

BJP mayor declared in Nagpur even before results? Accused of violating code of conduct
लोकमत न्यूज नेटवर्क
नरखेड : नरखेड नगरपरिषदेच्या निवडणूक प्रक्रियेचा अवमान करणारा प्रकार भाजपकडून उघडकीस आला. नगराध्यक्ष पदाचा अधिकृत निकाल जाहीर होण्याआधीच भाजपचे उमेदवार मनोज कोरडे यांचा नगराध्यक्ष म्हणून प्रचार करण्यात येत असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) यांनी केला आहे. हा प्रकार केवळ आचारसंहितेचा उघड भंग नसून, मतदारांवर दबाव निर्माण करणारा आणि निवडणूक प्रक्रियेची निष्पक्षता धोक्यात आणणारा असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
नरखेड नगरपरिषदेचे मतदान २ डिसेंबर रोजी झाली. न्यायालयीन कारणांमुळे प्रभाग क्रमांक २ ब, ५ ब आणि ७ अ येथील मतदान लांबणीवर पडले. या तीन जागांसाठी २० डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. निवडणुकीचा अंतिम निकाल २१ डिसेंबर रोजी जाहीर होणार आहे. असे असतानाही भाजपकडून प्रचार फलकांवर नगराध्यक्ष मनोज कोरडे असा उल्लेख करून थेट निकालावर शिक्कामोर्तब केल्याचा प्रकार घडल्याचा आरोप करण्यात आला आहे.
लांबणीवर पडलेल्या जागांसाठी सरू असलेल्या प्रचारादरम्यान भाजपने निवडणूक आयोगाच्या नियमांना केराची टोपली दाखवून, जनमताला दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे. मतदारांना चुकीचा संदेश देणारा असल्याचा आरोप करत. संबंधित प्रचार फलकांचे प्रकाशक, संबंधित व्यक्ती व उमेदवार यांच्यावर आचारसंहिता नियमांनुसार तत्काळ कठोर कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादी (शरद पवार) चे शहर अध्यक्ष संजय चरडे यांनी नरखेडच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे लेखी स्वरूपात केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे सलील देशमुख यांनी लागणारा निकाल हा पूर्वनियोजित तर नाही ना अशी शंका व्यक्त केली आहे. तसेच प्रशासन निवडणुकीत भाजपला जास्त झुकते माप देत असल्याचा आरोप केला.
नियमानुसार कारवाई होणार : खोडके
राष्ट्रवादीकडून संबंधित तक्रार दाखल झाली आहे. संपूर्ण प्रकरणाची निष्पक्षपणे चौकशी करून नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असे तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी उमेश खोडके यांनी सांगितले.