कमलेश वानखेडेलोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : महापालिकेच्या निवडणुकीसाठी अखेर शिंदेसेनेने ५० जागांचा प्रस्ताव भाजपला दिला. शुक्रवारी शिंदे सेनेच्या नेत्यांनी भाजप नेत्यांची भेट घेतली. प्रभागनिहाय अपेक्षित असलेल्या एकूण ५० जागांची यादी भाजप नेत्यांकडे सोपविली. शिंदेसेनेने १५१ पैकी तब्बल ५० जागांची मागणी केल्यामुळे भाजप नेत्यांच्या भुवया उंचावल्या. २१ डिसेंबर रोजी भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकित शिंदेसेनेच्या प्रस्तावावर चर्चा होईल. यानंतर त्याच दिवशी सायंकाळी दोन्ही पक्षाच्या नेत्यांची पुन्हा बैठक होईल. या बैठकित शिंदेसेनेसाठी किती जागा सोडण्याची तयारी आहे, हे भाजपकडून स्पष्ट केले जाईल.
शिंदेसेनेचे उपनेते आ. कृपाल तुमाने, पूर्व विदर्भ संपर्कप्रमुख किरण पांडव, नागपूर महानगर जिल्हा प्रमुख सूरज गोजे शुक्रवारी दुपारी शिक्षक सहकारी बँकेतील कार्यालयात पोहचले. येथे भाजपाचे नागपूर महापालिका निवडणूक प्रभारी आ. प्रवीण दटके, नागपूर मनपा निवडणूक संसदीय मंडळाचे सदस्य माजी आमदार प्रा. अनिल सोले, माजी आ. गिरीश व्यास यांच्याशी जागावाटप बाबत चर्चा केली.
केंद्रात व राज्यात शिंदेसेना महायुतीत सहभागी आहे. त्यामुळे महापालिकेतही कार्यकर्त्यांच्या हितासाठी युती व्हावी, अशी अपेक्षा शिंदेसेनेच्या नेत्यांनी व्यक्त केली. यावेळी प्रभाग निहाय एकूण ५० जागांची यादी सोपविण्यात आली. प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय ६ ते ९ जागांचा यात समावेश आहे. गेल्या निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवारांना मिळालेली मते व यावेळी संबंधित जागांवर पक्षाकडे असलेले सक्षम उमेदवारांचे मेरिट विचारात घेऊनच जागांचा प्रस्ताव देण्यात आल्याची भूमिका किरण पांडव यांनी मांडली.
यावर आ. प्रवीण दटके यांनी सांगितले की, २१ डिसेंबर रोजी आयोजित भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत या प्रस्तावावर चर्चा केली जाईल. या बैठकीनंतर शिंदेसेनेच्या नेत्यांशी बैठक होईल व तीत कोअर कमिटीने किती जागा सोडण्याची तयारी दर्शविली आहे, याचा खुलासा केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. प्रस्ताव जरा जास्तच मोठा आहे....
शिंदेसेनेनेने एकूण पन्नास जागांची मागणी करीत ३३ टक्के वाटा मागितला आहे. या प्रस्तावावर भाजप नेत्यांनी भुवया उंचावल्या. गेल्यावेळी शिवसेना एकसंघ असताना दोन जागा जिंकल्या होत्या. पक्षफुटीनंतर दोन्ही त्यावेळचे नगरसेवक उद्धव सेनेतच कायम आहेत. शिंदेसेनेकडे एकही नगरसेवक नसताना तब्बल ५० जागांची मागणी केल्यामुळे भाजप नेत्यांनी हा प्रस्ताव फारसा सिरियसली घेतलेला नसल्याचे माहिती आहे. भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याने याबाबत ‘प्रस्ताव जरा जास्तच मोठा आहे’, अशी सूचक प्रतिक्रिया दिली.
दोन दिवसांनी पुन्हा बैठक
"शिंदेसेनेडे सक्षम उमेदवार आहेत. त्यामुळेच भाजपकडे ५० जागांची मागणी करीत तशी यादी भाजप नेत्त्यांकडे सादर केली. दोन दिवसांनी पुन्हा बैठक होईल. त्यात अंतिम निर्णय होईल, असे भाजपकडून स्पष्ट करण्यात आले आहे. "- आ. कृपाल तुमाने उपनेता, शिंदेसेना
Web Summary : Shinde's Sena proposed 50 seats to BJP for Nagpur Municipal Corporation elections, surprising BJP leaders. Discussions occurred, with BJP's core committee to decide. A further meeting will determine seat allocation.
Web Summary : शिंदे सेना ने नागपुर नगर निगम चुनाव के लिए भाजपा से 50 सीटों का प्रस्ताव रखा, जिससे भाजपा नेता हैरान हैं। चर्चा हुई, भाजपा की कोर कमेटी फैसला करेगी। अगली बैठक में सीट आवंटन तय होगा।