नागपुरात भाजपकडून मनपाच्या उमेदवारांची चाचपणी सुरू, प्रमुख कार्यकर्त्यांसोबत ‘वन टू वन’ चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2025 23:58 IST2025-11-17T23:58:16+5:302025-11-17T23:58:58+5:30
मागील साडेतीन वर्षांपासून निवडणूक न झाल्याने भाजपकडे ३८ ही प्रभागांमध्ये इच्छुकांची संख्या वाढली आहे.

नागपुरात भाजपकडून मनपाच्या उमेदवारांची चाचपणी सुरू, प्रमुख कार्यकर्त्यांसोबत ‘वन टू वन’ चर्चा
- योगेश पांडे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आगामी महानगरपालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारांच्या चाचपणीला सुरुवात झाली आहे. भाजपकडून प्रत्येक प्रभागात स्वतंत्र सर्वेक्षण तर सुरूच आहे. सोबतच पक्षाच्या मोठ्या पदाधिकाऱ्यांकडून सर्वच प्रभागांतील प्रमुख कार्यकर्त्यांसोबत ‘वन टू वन’ चर्चेला सुरुवात झाली आहे. पुर्व नागपुरात यासंदर्भात सत्रांचे आयोजन करण्यात आले होते व यात प्रभागांतील पदाधिकारी-प्रमुख कार्यकर्त्यांकडून कोणता चेहरा प्रभावी उमेदवार होऊ शकतो हे जाणून घेण्यात आले.
मागील साडेतीन वर्षांपासून निवडणूक न झाल्याने भाजपकडे ३८ ही प्रभागांमध्ये इच्छुकांची संख्या वाढली आहे. माजी नगरसेवकांसोबतच तरुणतुर्क पदाधिकारीदेखील निवडणूक लढविण्यासाठी सज्ज आहेत. प्रभागातून कुणाला तिकीट मिळेल याबाबत विविध कयास लावण्यात येत असून प्रत्येक जण आपापल्या परिने ‘सेटिंग’च्या व्यवस्थेत आहे. दुसरीकडे पक्षाकडून दमदार उमेदवारांची नावे अंतिम करण्यात येत आहेत. याअंतर्गतच पुर्व नागपुरचे आमदार कृष्णा खोपडे यांच्या जनसंपर्क कार्यालयातून ‘वन टू वन’ चर्चांची सुरुवात झाली. वर्धमान मंडळ, पारडी मंडळ व वाठोडा मंडळाच्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांना बोलविण्यात आले.
माजी आमदार मिलिंद माने यांनी वर्धमान मंडळातील प्रभाग ५, २१, २२ व २३, माजी आमदार अनिल सोले यांनी पारडी मंडळातील प्रभाग ४,२४ व २५ तर भाजपचे कोषाध्यक्ष राजेश बागडी यांनी वाठोडा मंडळातील प्रभाग २६,२७ व २८ मधील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. सर्वांना वैयक्तिकपणे बोलविण्यात आले व त्यांची मते जाणण्यात आली. त्यावेळी पुर्व नागपुरातील इतर पदाधिकारी किंवा सदस्य तिथे उपस्थित राहणार नाही याची दक्षता घेण्यात आली होती.
सर्वांची मते लिफाफ्यात बंद
या ‘वन टू वन’ चर्चेदरम्यान अनेक इच्छुकांनी स्वत:च्या उमेदवारीचे दावे सादर केले. तीनही प्रमुख पदाधिकाऱ्यांकडून सर्वांची मते बंद लिफाफ्यात टाकून तो अहवाल शहर कार्यकारिणीकडे पाठविण्यात आली आहे.