बिस्किट चोरणाराला कँटीन मालकाकडून अमानूष मारहाण
By नरेश डोंगरे | Updated: July 27, 2024 18:57 IST2024-07-27T18:56:49+5:302024-07-27T18:57:14+5:30
Nagpur : घटनेचा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल ; रेल्वे प्रशसनात खळबळ

Biscuit thief brutally beaten by canteen owner
नरेश डोंगरे - नागपूर
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :रेल्वे स्थानकावरच्या फूड स्टॉलवरून बिस्किट चोरणारा रंगेहात सापडल्यानंतर कॅन्टीनच्या संचालकाने त्याला अमाणूष मारहाण केली. हा प्रवासी कुठला आणि आरोपींवर काय कारवाई झाली, त्याची माहिती रेल्वे पोलीस अथवा रेल्वे सुरक्षा दलाकडून स्पष्ट झाली नाही. मात्र, या घटनेचा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल झाल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली आहे.
रेल्वेच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, छत्तीसगडमधील रायपूर रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक १ वर शुक्रवारी सायंकाळी एक गाडी आल्यानंतर तेथील फुड स्टॉलवर झूंबड झाली. ग्राहक खाण्यापिण्याच्या वस्तू घेत असतानाच एकाने स्टॉलवरच्या बरणीतील बिस्कीट काढण्याचा प्रयत्न केला. चोरीच्या घटनांपासून सावधान राहण्यासाठी कॅन्टीनच्या संचालकाने तेथे अलार्म लावला होता. बिस्किट काढण्याचा प्रयत्न होताच तो अलार्म वाजला. त्यामुळे कॅन्टीनच्या संचालकाने त्या तरुणाला पकडले. बाचाबाची झाल्यानंतर कॅन्टीन चालविणाऱ्या दोघांनी त्या तरुणाला बेदम मारहाण केली. त्यानंतर त्याच्या पायाला दोर बांधून त्याला फलाटावरून फरफटत नेले. या अमाणूष घटनेचा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल झाल्यानंतर रेल्वे प्रशसनात एकच खळबळ निर्माण झाली. दरम्यान, ज्याला अमाणूष मारहाण झाली आणि ज्यांनी मारहाण केली, त्यांची नावे रेल्वे पोलीस किंवा रेल्वे सुरक्षा दलाकडून स्पष्ट होऊ शकली नाही. या संबंधाने काय कारवाई झाली, ते सुद्धा कळू शकले नाही.