सफाई कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा ! नागपूर मनपातील ४४०७ अधिसंख्या कर्मचाऱ्यांना लाड पागे समितीच्या शिफारसी लागू होणार
By योगेश पांडे | Updated: October 9, 2025 19:22 IST2025-10-09T19:20:27+5:302025-10-09T19:22:27+5:30
Nagpur : सफाई कर्मचाऱ्यांना लाड पागे समितीच्या शिफारशी लागू करण्याची मागणी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. याला आता शासनाने मान्यता दिली आहे.

Big relief for sanitation workers! Lad Page Committee recommendations will be implemented for 4407 majority employees of Nagpur Municipal Corporation
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या आकृतीबंधातील ४४०७ अधिसंख्य सफाई कर्मचाऱ्यांना आता लाड पागे समितीच्या शिफारशी लागू होणार आहेत. गुरुवारी यासंदर्भात शासनाच्या नगर विकास विभागाने याबाबत शासन निर्णय जारी केला आहे.
ऐवजदार कर्मचाऱ्यांना नियमित करण्यासाठी निर्माण करण्यात आलेली अधिसंख्य पदे त्यांच्या सेवानिवृत्तीनंतर व्यपगत होत असल्याने कामगारांच्या वारसदारांना नियुक्ती देण्यासाठी पद निर्माण करता येत नव्हते. यासंदर्भात आ.प्रवीण दटके यांनी विधीमंडळात हा मुद्दा मांडला होता. सफाई कर्मचाऱ्यांना लाड पागे समितीच्या शिफारशी लागू करण्याची मागणी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. याला आता शासनाने मान्यता दिली आहे.
या निर्णयामुळे नागपूर महानगरपालिकेतील ४,४०७ ऐवजदार कर्मचाऱ्यांची अधिसंख्य पदे निर्माण करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. या आकृतीबंधात सफाई कर्मचाऱ्यांची ८,५६० पदे मंजूर करण्यात आलेली आहेत. अधिसंख्य पदावर सामावून घेण्यात आलेल्या परंतु मयत किंवा सेवानिवृत्त झालेल्या सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसदारांना आता वारसा हक्काचा लाभ मिळणार आहे. संबंधित कर्मचाऱ्यांनी तातडीने मनपाकडे अर्ज करावे असे दटके यांनी सांगितले आहे.