लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बैंक लोकपाल असल्याची बतावणी करत सायबर गुन्हेगारांनी ७८ वर्षीय वृद्ध व्यावसायिकाची ५३.९६ लाखांनी फसवणूक केली. या प्रकरणात पोलिसांनी गाझियाबाद येथून दोन आरोपींना अटक केली आहे. बजाजनगर पोलिस ठाण्याच्या पथकाने ही कारवाई केली.
विजय कृष्णराव सोनटक्के (७८, सुरेंद्रनगर) असे संबंधित व्यावसायिकाचे नाव आहे. त्यांची मुले व मुली विदेशात राहतात व ते १५ ते १६ विमा पॉलिसीचे हफ्ते भरत होते. हे पैसे ऑटो डेबिटने जात होते. आता पुढे पॉलिसी सुरू ठेवायची नसल्याने ते तसे पॉलिसी कंपन्यांना कळविणार होते. दरम्यान त्यांना त्रिवेदी नामक व्यक्तीने त्यांना बजाज अलायन्झमधून बोलत असल्याचे सांगितले व त्याने पॉलिसी बंद करण्यावरून सोनटक्के यांच्याशी वाद घातला. १९ सप्टेंबर रोजी त्यांना हरीहर मिश्रा नावाच्या व्यक्तीचा फोन आला व त्याने तो बँकिंग लोकपालमधून बोलत असल्याचे सांगितले. तुम्ही तुमच्या पॉलिसी बंद करू शकता असे सांगत त्याने मंदिरा माथूर नावाच्या तथाकथित अधिकाऱ्यासोबतदेखील बोलणे करून दिले. आम्ही सर्व कंपन्यांच्या विमा पॉलिसीवर नियंत्रण ठेवत असतो असा दावा आरोपींनी केला. सर्व पॉलिसीची मॅच्युरीटी रक्कम ९५ लाखांहून अधिक असून त्या बंद करण्यासाठी पैसे भरावे लागतील असे आरोपींनी सांगितले. ते सोनटक्के यांची सर्व माहिती अचूक सांगत होते व त्यांच्या मुलाशीदेखील त्यांनी बोलणे केले. सोनटक्के यांचा विश्वास बसल्याने त्यांनी वेगवेगळ्या खात्यांत ५३.९६ लाख रुपये भरले. मात्र त्यानंतर तथाकथित मिश्रा व माथूर यांचा फोन बंद येऊ लागला. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे सोनटक्के यांच्या लक्षात आले. त्यांच्या तक्रारीवरून बजाजनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. बजाजनगर पोलिस ठाण्याच्या पथकाने तांत्रिक पद्धतीने तसेच मनी ट्रेलच्या माध्यमातून तपास सुरू केला. पोलिसांनी त्या आधारे साई वैभव भरत दास (२०, संजय नगर, गाजियाबाद) व निशांत गिरीश त्यागी (२४, बालाजी एन्क्लेव्ह, गाजियाबाद) या दोघांना ताब्यात घेतले. त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली.
लॅपटॉपसह मुद्देमाल जप्तआरोपींच्या ताब्यातून रोख २४.३५ लाख, चार मोबाइल, सीमडस, लॅपटॉप जप्त करण्यात आले. वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरेंद्र अहेकर, बळीराम सुतार, दीपक पवार, अरुणा चौरे, संजय मनस्कर, महल्ले, तरारे, नितेश तळसे, नितेश मेश्राम, योगेश्वर यांच्या पथकाने ही कारवाई केली.
विविध खात्यांत केली वळती रक्कमआरोपींनी सोनटक्के यांच्याकडून आलेली रक्कम विविध बँक खात्यांमध्ये वळती केली होती. या खातेदारांचा शोध घेण्यात आला असून त्यांच्या तक्रारीवरून आरोपींविरोधात गाजियाबाद येथील मधुबन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी काही खाती भाड्यानेदेखील घेतली होती.