लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केंद्र सरकारच्या जनविरोधी आर्थिक धोरणे आणि कामगारविरोधी धोरणांच्या निषेधार्थ ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन, ऑल इंडिया बँक ऑफिसर्स असोसिएशन आणि बँक एम्प्लॉईज फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या संयुक्त आवाहनानुसार, बँक कर्मचाऱ्यांनी बुधवारी देशव्यापी संपात सहभागी झाले. त्यामुळे नागपुरात १,८०० कोटी रुपये आणि संपूर्ण विदर्भात २,४०० कोटी रुपयांच्या बँकिंग व्यवसायावर परिणाम झाल्याची माहिती आहे.
बँक कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी किंग्ञ्जवे येथील बँक ऑफ इंडिया परिसरात निदर्शने केली. यादरम्यान ५०० हून अधिक बैंक कर्मचारी सहभागी झाले. यावेळी विविध संघटनांचे नेते सुरेश बोभाटे, चेंडिल अय्यर, अरविंद गाडीकर यांच्या नेतृत्वात या आंदोलनात राष्ट्रीयीकृत बँकांच्या खासगीकरणाला आणि कामगारविरोधी धोरणांना विरोध केला. हा संघर्ष भारत सरकारच्या कामगारविरोधी, जनविरोधी, कॉर्पोरेट समर्थक आणि राष्ट्रविरोधी विध्वंसक धोरणांना तीव्र विरोध करण्यासाठी आहे. सामान्य लोकांचे जीवन, उपजीविका आणि देशाची अर्थव्यवस्था संकटाच्या उंबरठ्यावर आली आहे. लोकांनी या संघर्षात एकत्र येण्याचे आवाहनही त्यांनी केले.
बीएसएनएल कर्मचारी संपात सहभागीहिंद मजदूर सभा-केंद्रीय व्यापारी संघटनेच्या आवाहनावरून बीएसएनएल कर्मचारी संघटना आणि एनएफटीई बीएसएनएल संघटना देशव्यापी संपात सामील झाल्या. अखिल भारतीय बीएसएनएल डीओटी पेन्शनर असोसिएशननेही संविधान चौकातील या आंदोलनात सहभाग घेतला आणि बीएसएनएलच्या निवृत्त कर्मचाऱ्यांच्या मुख्य मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधले. पंचम गायकवाड, विशाल मेश्राम, सुरेश कायते, राकेश मेश्राम, बीएसएनएल कर्मचारी संघटनेचे पांडे कृष्णा कडगाये, एनएफटीईचे हरेंद्र पांडे, संतोष अहिर, एन. नायडू इत्यादींनी आंदोलनाच्या यशासाठी पाठिंबा दिला.