भद्रावतीच्या तरुणीची नागपुरात आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2019 22:20 IST2019-12-10T22:18:51+5:302019-12-10T22:20:07+5:30
मनासारखा रोजगार मिळत नसल्याने नैराश्य आलेल्या तरुणीने गळफास लावून आत्महत्या केली.

भद्रावतीच्या तरुणीची नागपुरात आत्महत्या
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मनासारखा रोजगार मिळत नसल्याने नैराश्य आलेल्या तरुणीने गळफास लावून आत्महत्या केली. पौर्णिमा ऊर्फ डोडो राजू सांगोरे (वय २२, रा. पंचशीलनगर भद्रावती) असे तिचे नाव आहे.
पौर्णिमा आणि तिची मैत्रीण मेघा करणदास मेश्राम (वय २३, रा. लालापेठ कॉलनी चंद्रपूर) या दोघींनी पारिचारिकेचा अभ्यासक्रम केला होता. रोजगाराच्या शोधात त्या नागपुरात आल्या होत्या. त्या दोघी गणेशपेठेतील गंजीपेठमध्ये दीपक सुपारेच्या घरी भाड्याने राहत होत्या. मनासारखा रोजगार मिळत नसल्याने पौर्णिमा काही दिवसांपासून निराश होती. सोमवारी सकाळी मेघा रूमबाहेर निघून गेली. दुपारी ३ च्या सुमारास ती घरी परतली. रूमचे दार बंद असल्याने तिने पौर्णिमाला आवाज दिला. काहीच प्रतिसाद मिळत नसल्याने घरमालकाच्या कुटुंबीयांना सांगितले. त्यांनी दाराच्या फटीतून बघितले असता पौर्णिमा गळफास लावलेल्या अवस्थेत दिसली. मेघा हिने दिलेल्या सूचनेवरून गणेशपेठ पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.