भदंत सुरेई ससाई यांना आंतरराष्ट्रीय धम्मरत्न नोबेल पुरस्कार
By आनंद डेकाटे | Updated: November 21, 2025 20:08 IST2025-11-21T20:07:35+5:302025-11-21T20:08:25+5:30
Nagpur : संविधानदिनी दीक्षाभूमीच्या सभागृहात वितरण सोहळा

Bhadant Surei Sasai wins International Dhamma Ratna Nobel Prize
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जीवनभर धम्माचा प्रचार-प्रसार आणि बुद्धधगया विहार मुक्ती आंदोलन उभारण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांना आंतरराष्ट्रीय अशोका आंबेडकर धम्मरत्न नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. येत्या २६ नोव्हेंबर संविधानदिनी दीक्षाभूमीच्या सभागृहात सकाळी १०.३० वाजता त्यांना हा पुरस्कार वितरित करण्यात येणार आहे.
बुद्धीस्ट फॅटरनिटी कॉन्सिल, बुद्धीस्ट फॅटरनिटी वुमन्स संघ आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती, दीक्षाभूमीच्या संयुक्त विद्यमाने या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वुमन्स संघाच्या राष्ट्रीय अध्यक्षा रोशनी गायकवाड राहतील. तामिळनाडूचे आमदार सिंधन सेलव्हन, संघाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. भारती प्रभू, संघाचे तामिळनाडू प्रदेशाध्यक्ष अन्बू सेल्व्ही, ॲड. मयुरी कीर्ती, स्मारक समितीचे डॉ. सुधीर फुलझेले, डॉ. राजेंद्र गवई, एन.आर. सुटे, विलास गजघाटे, आनंद फुलझेले यांचीही उपस्थिती राहील.
पुरस्काराबाबत माहिती देताना भारती प्रभू यांनी सांगितले की, जगभरात शांती, करुणा, मैत्री आणि बंधुभाव निर्माण करणाऱ्या आणि समाजाला समर्पित असणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात येणार आहे. हा पुरस्कार आंतरराष्ट्रीय स्तरावर देण्यात येणार आहे. संघटनेतर्फे दिला जाणारा हा पहिलाच पुरस्कार असून गेल्या ६० वर्षांपासून देशात धम्माचा प्रचार, प्रसार करणारे भदंत ससाई हे या पुरस्काराचे पहिलेच मानकरी ठरले आहेत. पुरस्काराचे स्वरूप १ लाखाचा धनादेश, सम्राट अशोक यांची मूर्ती, प्रमाणपत्र आणि शिल्ड असे असणार आहे.
भदंत ससाई यांचे कार्यभदंत ससाई यांनी मनसर येथे उत्खनन करून आयुर्वेद आणि रसायनचे जनक नागार्जुन यांचा इतिहास जगासमोर आणला. महाबोधी महाविहार मुक्तीसाठी तब्बल १९ वर्षे आंदोलन केले. हुसेन सागर येथे बुद्धमूर्ती स्थापित करण्यासाठी पुढाकार घेतला. ६० वर्षांपासून ते धम्माचा प्रचार-प्रसार करीत आहेत. तसेच छत्तीसगडच्या शिरपूर येथेही उत्खनन करून बौद्ध इतिहास समोर आणला.