तीन पिढ्यांचे मुक्त कलावैभव घडविणारे बसोली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2018 12:01 AM2018-05-15T00:01:36+5:302018-05-15T00:01:49+5:30

लाल कावळा पिवळा राघू, बंधन नाही कशाचे, काढू फांद्या जमिनीलागून, आकाशीला मुळे, आम्ही बसोलीची मुले... बसोलीच्या जगाची ओळख म्हणजे या त्यांच्याच गीताप्रमाणेच आहे.

Basoli, who created three generations of free art | तीन पिढ्यांचे मुक्त कलावैभव घडविणारे बसोली

तीन पिढ्यांचे मुक्त कलावैभव घडविणारे बसोली

Next
ठळक मुद्देरंगरेषांना बंधनमुक्त ठेवणारा ४३ वर्षांचा प्रवासचन्ने सरांनी साकारलेले कलाजग

लोकमत  न्यूज नेटवर्क 
नागपूर : लाल कावळा पिवळा राघू, बंधन नाही कशाचे,
काढू फांद्या जमिनीलागून, आकाशीला मुळे, आम्ही बसोलीची मुले...
बसोलीच्या जगाची ओळख म्हणजे या त्यांच्याच गीताप्रमाणेच आहे. मुक्त आणि दिलखुलास! रंग-रेखा, आकृती-बंध यांची चाकोरी नाही. मनास वाटतील तसे रंग चितारण्याची मुभा या बसोली नावाच्या शाळेत आहे. लहान मुलांना त्यांच्या भावविश्वानुरूप व्यक्त होण्याचे स्वातंत्र्य आहे. असे रंगरेषांना बंधनमुक्त ठेवणारे जग चित्रकार चंद्रकांत चन्ने यांनी वसवले. त्याच चिकाटीने त्यांच्या बालसदस्यांमध्ये कलासक्ती रुजवली आणि फुलवली. आज हे मुक्तविहारी कलाजग ४४ व्या वर्षांत पदार्पण करीत आहे. स्वतंत्र वृत्तीतून तीन पिढ्यांमध्ये कलेची आसक्ती फुलविण्याचे योगदान ‘बसोली’ने दिले आहे.
शांतिनिकेतन, बडोदा येथून स्नातकोत्तर पदवी घेतल्यानंतर त्यांना चित्रकलेत पीएचडी करायची होती. ‘मुलांची भाषा’ हा त्यांचा पीएचडीचा विषय होता. त्यांचे गुरू निहार रंजन रे यांनी मातृभाषेतच मुलांमध्ये काम कर, अशी आज्ञा दिली. त्यावेळी नागपूरला येऊन चंद्रकांत चन्ने यांनी १५ मे १९७५ साली बसोलीची मुहूर्तमेढ रोवली. हिमालयाच्या पायथ्याशी असलेले व भारतीय कलासंस्कृती जपणारे गाव म्हणजे बसोली. या नावावरून वसवलेले चन्नेसरांचे हे कलाजग. पुढे पं. बच्छराज व्यास विद्यालयात शिक्षकाची नोकरी स्वीकारल्यापासून लहान मुलांमध्ये कलासक्ती रुजविण्याचा हा प्रवास त्यांच्या निवृत्तीनंतरही आजतागायत अविरत सुरू आहे.
बसोलीचा सदस्य होण्यासाठी तीन ते चौदा वयोगटातील असण्यापलीकडे कसलीही अट नाही, प्रवेश फी नाही. चित्रकलेचे प्राथमिक ज्ञान असणे गरजेचे नाही. ‘ज्याला चालता येते तो आम्हाला चालतो’ हे बसोलीचे ब्रीदवाक्य. १९९४ पासून बसोलीची मुक्तशिबिरे सुरू झाली. वेळापत्रक झुगारून मनमोकळ्या वातावरणात मुलांना त्यांच्या अंगातील कलागुणांनी व्यक्त होऊ द्यायचे. येथे चित्रकला शिकवली जात नाही. जे हवे जसे हवे तसे चित्र रेखाटण्याची मुभा. मुलांना जपा, त्यांना वेळ द्या आणि त्यांच्यावर आपली मते लादू नका, अशीही शिबिरे घेण्याची चन्ने सरांची कळकळ. मुलांची अभिव्यक्ती बघून प्रत्येक पालकही मनोमनी सुखावतो. त्यांनी बसोलीची सुरुवात केली तेव्हा ४३ विद्यार्थी होते. आज या कलाजगाची सदस्यसंख्या दीड लाखांच्याहीवर गेल्याचे चंद्रकांत चन्ने यांनी सांगितले. चित्रकलेसोबत जोडून मुलांमध्ये नृत्य, लेखन, गायन, वक्तृत्व, शिल्पकला अशा इतरही कलागुणांना फुलविण्याचे काम बसोलीत सुरू झाले.

 असंख्य कलावंत निर्माण केले
कलेच्या या प्रवासात अनेक कलावंत घडविले असून विविध क्षेत्रत नावरूपास आले आहेत. ‘थ्री इडियट्स’चे प्रॉडक्शन डिझायनर रजनीश हेडाऊ, दिग्दर्शक राजेश मापुसकर, गायक राजेश ढाबरे, चित्रपट दिग्दर्शक अभिजित गुरू, नेपथ्यकार संजय काशीकर, अभिनेता मुकुंद वसुले, ग्राफिक डिझायनर विवेक रानडे असे अनेक व्यक्तिमत्त्व त्यांच्या क्षेत्रत योगदान देत आहेत.

 राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरस्कार आणि शाबासकी
कलानिर्मितीच्या या ४३ वर्षात दीड लाख सदस्य बसोलीशी जुडले. विविध आंतरराष्ट्रीय बालचित्रकला स्पर्धाअंतर्गत  ३४ देशांमध्ये मुलांनी सुवर्ण पदक प्राप्त केले.५ बालश्री पुरस्कार, शासनाच्या मानव कल्याण मंत्रलयातर्फे १०२ शिष्यवृत्ती अवॉर्ड व यासोबत अनेक राष्ट्रीय व राज्यस्तराचे पुरस्कार बसोलीच्या मुलांनी प्राप्त केले आहेत. ए.पी.जे.अब्दुल कलाम राष्ट्रपती असताना त्यांच्या कवितांवर काव्यचित्रे त्यांना पेश केली होती. विस्मयचकित महामहिमांनी ती चित्रे मागवून घेतली व राष्ट्रपती भवनात सुंदर चौकटीत आभूषित केली. गुरुवर्य रवींद्रनाथ टागोर ह्यांच्या सव्वाशेव्या जयंतीनिमित्त त्यांच्या गीतांजलीवर बसोली बालकांनी रंगचित्रे रेखाटली. बाबा आमटेंच्या ‘ज्वाला आणि फुले’, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या ‘मेरी कविताये’ तसेच कवी सुरेश भट व ग्रेस यांच्या कवितांवरही बसोलीच्या मुलांनी चित्र रेखाटून शाबासकी मिळविली. लंडनमध्ये सहा कार्यशाळा आणि कतारमध्ये आठ दिवसांचे शिबिरेही मुलांनी केली आहेत.

 आनंदी पालक, आनंदी मुले
यावर्षी मानवविकास मंत्रलयाअंतर्गत ‘आनंदी पालक, आनंदी मुले’ या संकल्पनेवर बसोलीतर्फे देशभरात उपक्रम राबविणार असल्याचे चंद्रकांत चन्ने यांनी सांगितले. नागपूरच्या शिबिरातही हा उपक्रम राबविला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

Web Title: Basoli, who created three generations of free art

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.