उत्तरप्रदेशमधील व्यक्तीच्या नावावर कर्ज घेऊन नागपुरात बॅंकेची फसवणूक
By योगेश पांडे | Updated: August 25, 2022 17:28 IST2022-08-25T17:25:11+5:302022-08-25T17:28:07+5:30
नाव सारखे असल्याचा फायदा घेत उचलले सहा लाखांचे कर्ज

उत्तरप्रदेशमधील व्यक्तीच्या नावावर कर्ज घेऊन नागपुरात बॅंकेची फसवणूक
नागपूर : नावात काय आहे, असे प्रसिद्ध इंग्रजी लेखक शेक्सपिअरने म्हटले होते. मात्र नावातील साम्याचाच फायदा घेऊन नागपुरातील एका व्यक्तीने उत्तरप्रदेशमधील व्यक्तीचे बनावट दस्तावेज देऊन उज्जीवन स्मॉल फायनान्स बॅंकेची सहा लाखांनी फसवणूक केली आहे. उत्तर प्रदेश सायबर सेलकडून माहिती प्राप्त झाल्यानंतर ही फसवणूक उघडकीस आली. या प्रकरणात लकडगंज पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आकाश शरद गुप्ता (३३, रामटेके नगर, बाबुलखेडा) याने उज्जीवन स्मॉल फायनान्स बॅंकेच्या पोर्टलवर २७ सप्टेंबर २०२० रोजी सहा लाखांच्या पर्सनल लोनसाठी अर्ज केला होता. त्याने सोबत आधारकार्ड, पॅनकार्ड, रेंट ॲग्रिमेन्ट, सॅलरी स्लिप, जॉब आयडी कार्ड, आयसीआयसीआय बॅंके खात्याचे स्टेटमेंट बॅंकेच्या पोर्टलवर अपलोड केले. बॅंकेच्या बंगळुरू येथील मुख्यालयाने ५ ऑक्टोबर रोजी कर्जाला मंजुरी दिली. त्याच दिवशी बॅंकेचे कर्ज अधिकारी भावेश वानोडे यांनी आकाशची कर्जाच्या करारावर स्वाक्षरी घेतली होती. आकाशच्या बॅंक खात्यात ५ लाख ९० हजारांची कर्जाची रक्कम वळती करण्यात आली होती.
दरम्यान २८ जून २०२१ रोजी उत्तर प्रदेश पोलिसांच्या सायबर गुन्हे कार्यालयाकडून बॅंकेच्या मुख्यालयाला संपर्क करण्यात आला. कानपूर येथील आकाश सुनिल गुप्ता या व्यक्तीने सायबर सेलकडे तक्रार केली होती. त्याचे आधारकार्ड व पॅनकार्डचा वापर करून कुणीतरी कर्ज उचलले असल्याची त्याची तक्रार होती. यानंतर बॅंकेने अंतर्गत चौकशी लावली. त्यात आकाश शरद गुप्ता याने आकाश सुनिल गुप्ताच्या नावाची बनावट कागदपत्रे जमा करून कर्ज उचलल्याची बाब समोर आली. यासंदर्भात बॅंकेचे व्हिजिलन्स अधिकारी भूषण नंदनवार यांनी लकडगंज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्याआधारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.