‘आयटी अॅक्ट’नुसार करणार दलालांचा बंदोबस्त : महानिरीक्षक चौहान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2018 00:53 IST2018-12-22T00:51:30+5:302018-12-22T00:53:01+5:30
रेल्वे सुरक्षा दलाने रेल्वेगाड्यात महिलांची छेडखानी करणे, आयटी अॅक्टनुसार कारवाईचे अधिकार देण्याची मागणी शासनाकडे केली असून आयटी अॅक्टच्या मदतीने आॅनलाईन तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्यांचा बंदोबस्त करण्यात येईल, अशी माहिती दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दलाचे महानिरीक्षक आर. एस. चौहान यांनी पत्रकार परिषदेत दिली.

‘आयटी अॅक्ट’नुसार करणार दलालांचा बंदोबस्त : महानिरीक्षक चौहान
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रेल्वे सुरक्षा दलाने रेल्वेगाड्यात महिलांची छेडखानी करणे, आयटी अॅक्टनुसार कारवाईचे अधिकार देण्याची मागणी शासनाकडे केली असून आयटी अॅक्टच्या मदतीने आॅनलाईन तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्यांचा बंदोबस्त करण्यात येईल, अशी माहिती दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दलाचे महानिरीक्षक आर. एस. चौहान यांनी पत्रकार परिषदेत दिली.
महानिरीक्षक चौहान म्हणाले, पूर्वी चोरीची प्रकरणे लोहमार्ग पोलिसांकडे सोपवावी लागत होती. परंतु जेंव्हापासून या प्रकरणात कारवाईचे अधिकार आरपीएफला मिळाले, तेंव्हापासून अनेक आरोपी पकडण्यात आले. रेल्वे अॅक्टमध्ये संशोधनासाठी आरपीएफच्या चार वरिष्ठ अधिकाऱ्यांची कमिटी तयार करण्यात आली आहे. ही कमिटी शासनाच्या संपर्कात आहे. कमिटीतर्फे सुचविण्यात आलेले संशोधन संसदेत मंजूर होऊन लवकरच शासन आरपीएफला अधिकार देण्याची शक्यता आहे. ते म्हणाले, महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी लेडीज कोचच्या खिडक्यांना पिवळा रंग देण्यात आला आहे. पॅनिक बटन लावण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. नागपूर विभागात रेल्वे प्रॉपर्टी अॅक्टनुसार ३३ प्रकरणांचा निपटारा करून २.७७ लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. हा आकडा मागील १६ वर्षांपर्यंत मर्यादित होता. झोनमध्ये तिकिटांच्या काळाबाजाराचे ६० गुन्हे दाखल करून ६७ जणांना अटक करण्यात आली. यातील सर्वाधिक २५ गुन्हे नागपूर विभागातील आहेत. गांजाच्या तस्करीत ७.५० लाखाचा मुद्देमाल जप्त करून २० आरोपींना अटक करण्यता आली आहे. या वर्षी झोनमध्ये चोरीच्या ११४ गुन्ह्यात १८६ जणांना अटक करण्यात आली आहे. यात नागपूर विभागात सर्वाधिक ४९ गुन्ह्यात ८४ आरोपींना अटक करण्यात आली आहे. यात सर्वाधिक प्रकरणे मोबाईल चोरीची असून ८ लाखाचे मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.
विभागाला मिळणार १० ‘बॉडी विअर कॅमेरा’
विभागीय सुरक्षा आयुक्त आशुतोष पाण्डयेय यांनी सांगितले की, २६ जानेवारीपर्यंत आरपीएफच्या नागपूर विभागाला १० बॉडी विअर कॅमेरा मिळणार आहेत. त्याची मंजुरी मिळाली आहे. हे बॉडी विअर कॅमेरा रेल्वेगाड्यात गस्त घालणाऱ्या जवानांना देण्यात येतील. यात आठ तासांचे चित्रीकरण होणार आहे. कॅमेराच्या मदतीने आरपीएफ जवानांसह प्रवाशांच्या हालचालींची नोंद होऊन सत्य उजेडात येणार आहे. ते म्हणाले, दाखल असलेल्या गुन्ह्यात संगणकीकरणात दपूम रेल्वेचा नागपूर विभाग इतर विभागाच्या तुलनेत पुढे आहे. यावेळी सहायक सुरक्षा आयुक्त अमर कुमार स्वामी यांच्यासह आरपीएफचे अधिकारी उपस्थित होते.
६ कोटी खर्चुन नव्या पोस्टची निर्मिती
महानिरीक्षक चौहान यांनी सांगितले की, नागपूर-छिंदवाडा मार्गावर प्रवाशांची सुरक्षा मजबूत करण्यासाठी मुख्यालयाने सहा कोटींच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. यात छिंदवाडा, भंडारात नव्या पोस्ट, नैनपूर, बालाघाटसह इतर दोन ठिकाणी आऊट पोस्ट तयार करण्यात येतील. प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून इतवारी, रामटेकसह नागपूर विभागातील १७ रेल्वेस्थानकांवर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहेत.