नागपुरात 'आलिशान'शी संबंधित प्रतिष्ठानात सापडले 'बंधूआ मजदूर'; बाल संरक्षण पथकाचा छापा
By नरेश डोंगरे | Updated: February 5, 2026 20:15 IST2026-02-05T20:12:37+5:302026-02-05T20:15:54+5:30
अल्पवयीन मुलांकडून करवून घेतले जात होते काम : बाल संरक्षण पथकाचा छापा : इतवारीत मोठी कारवाई

'Bandhua Mazdoor' found in establishment related to 'Alishan' in Nagpur; Child Protection Squad raids
नरेश डोंगरे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : परप्रांतातील मुलांना आमिष दाखवून पळवून आणल्यानंतर त्यांना शहरातील एका प्रतिष्ठानाच्या कामासाठी 'बंधूआ मजदूर'सारखे ठेवल्याची खळबळजनक माहिती उघड झाली आहे. जिल्हा महिला व बालविकास विभाग, कामगार विभाग आणि जिल्हा बाल संरक्षण विभागाच्या पथकाने आज ईतवारी (गांधीबाग)मध्ये संयुक्तपणे छापा टाकला. यानंतर तेथे अनेक बालके राबराब राबत असल्याचे धक्कादायक वास्तव उघड झाले. या कारवाईमुळे उपराजधानील मुख्य आणि सर्वात मोठी व्यापारपेठ मानल्या जाणाऱ्या गांधीबाग, इतवारीत प्रचंड खळबळ उडाली आहे.
'आलिशान' कपड्यांची जोरदार मार्केटिंग करणाऱ्या ईतवारीतील एका प्रतिष्ठानाशी संबंधित नाशिर क्रिएशन्समध्ये मोठ्या प्रमाणात परप्रांतातील मजुरांना डांबून त्यांच्याकडून कामे करवून घेतले जात असल्याची आणि मजुरांमध्ये मोठ्या प्रमाणात लहान मुले असल्याची माहिती चाईल्ड हेल्पलाईन १०९८ वर कळाली. संबंधित अधिकाऱ्यांनी त्याची शहानिशा केल्यानंतर आज गुरुवारी सायंकाळी नाशिर क्रियेशन्समध्ये छापा घातला. यावेळी येथे मोठ्या प्रमाणात लहान-मोठे कर्मचारी काम करताना आढळले. त्यातील सहा मुले खूपच लहान दिसत असल्याने छापा कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांनी त्यांची वैद्यकीय तपासणी करून घेतली.
'आलिशान'मध्ये जात होता माल
इतवारीतील ज्या नाशिर क्रिएशन्समध्ये जिल्हा महिला व बालविकास विभाग, कामगार विभाग आणि जिल्हा बाल संरक्षण विभागाच्या पथकाने आज छापा घातला. त्या ठिकाणी या बालमजुरांसह अनेकांकडून बेकायदेशिर आणि जबरदस्तीने ब्लेझर, ट्राऊजरसह अन्य कपडे शिवून घेण्याचे काम करवून घेतले जात होते. अत्यल्प मोबदल्यात त्यांच्याकडून कलात्मक काम करवून घेतल्यानंतर तयार कपड्याचा हा माल 'आलिशान'मध्ये जात होता, अशी माहितीही प्राथमिक चाैकशीतून पुढे आली.
सारेच संतापजनक, १८-१८ तास काम
आलिशान कपड्याच्या दुकानातून / फॅक्टरीतून सोडविण्यात आलेल्यांपैकी ६ बालके १३ ते १६ वर्षे वयोगटातील आहेत. हे सर्व बिहारमधील रहिवासी आहेत. चांगल्या पैशाचे आणि सुखसोयीचे आमिष दाखवून त्यांना बिहारमधून येथे आणण्यात आले आणि त्यांच्याकडून 'बंधूआ मजदुरां'सारखे तब्बल १८-१८ तास कामे करवून घेतले जात होते. बदल्यात त्यांना आवश्यक सोयीसुविधाही दिल्या जात नव्हत्या, अशीही संतापजनक माहिती पुढे आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
तहसिल पोलिस ठाण्यात तक्रार
छाप्या दरम्यान संबंधित मुलांना कोणतीही कायदेशीर सुरक्षा, शिक्षण किंवा आवश्यक सुविधा न देता कामावर जुंपण्यात आल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे संबंधित आस्थापनाकडून बालकामगार (प्रतिबंध व नियमन) अधिनियम तसेच ज्युवेनाईल जस्टीस (केअर अॅन्ड प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रेन) अॅक्ट २०१५ अन्वये कलम ७५ (मुलांवरील क्रूरता) तसेच कलम ७९ (मुलांची बेकायदेशीर नेमणूक) यांचे गंभीर उल्लंघन झाले आहे. याशिवाय भारतीय न्याय संहिता (बीएनएस) मधील संबंधित कलमांनुसारही तहसील पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल करण्यात आली. संबंधित दोषी मालक, व्यवस्थापक व जबाबदार व्यक्तींविरुद्ध कायदेशीर कार्यवाही सुरू असल्याची माहिती जिल्हा बाल संरक्षण अधिकारी मुश्ताक पठाण यांनी दिली. या संबंधाने गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे ठाणेदार संजय मेंढे यांनी सांगितले.
रेस्क्यू करण्यात आलेली मुले बालगृहाच्या वाटेवर
रेस्क्यू करण्यात आलेल्या मुलांना बालगृहात दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. तसेच जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सुनील मेसरे, सहाय्यक कामगार आयुक्त राजदीप धुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा बाल संरक्षण अधिकारी मुस्ताक पठाण, शिक्षण विभागाचे प्रसेनजित गायकवाड, कामगार विभागाचे अविनाश डोके, मंजुषा पवनीकर, शीतल धरममाळी, तसेच चाईल्ड हेल्पलाइनचे प्रतिनिधी अनिकेत भिवगडे, मीनाक्षी धडाडे, विकी डहारे आणि ग्रामीण समस्या मुक्ती ट्रस्टच्या रूपाली वानखेडे यांनी सदर कार्यवाही केली.