Bachchu Kadu Protest : 'महामार्ग तातडीने मोकळा करा' बच्चू कडू यांना हायकोर्टाचा आदेश
By राकेश पांडुरंग घानोडे | Updated: October 29, 2025 17:40 IST2025-10-29T17:21:26+5:302025-10-29T17:40:23+5:30
Nagpur : सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्यास होईल कडक कारवाई

Bachchu Kadu Protest : 'Clear the highway immediately' High Court orders Bachchu Kadu
नागपूर : शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी सुरू असलेल्या बच्चू कडू यांच्या आंदोलनामुळे नागरिकांना होत असलेल्या मनस्तापाची मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठाने बुधवारी गंभीर दखल घेतली. तसेच, बच्चू कडू यांनी महामार्ग व इतर सर्व रस्ते तातडीने शांततापूर्ण पद्धतीने मोकळे करावे, असा आदेश दिला.
या प्रकरणावर न्यायमूर्ती रजनीश व्यास यांच्यासमक्ष सुनावणी झाली. मार्ग मोकळे करताना बच्चू कडू व त्यांच्या समर्थकांनी सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्यास त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा न्यायालयाने दिला. बच्चू कडू व त्यांच्या समर्थकांनी या आदेशाचे पालन करण्यास नकार दिल्यास आणि मार्ग मोकळे न केल्यास पोलिस आयुक्त, पोलिस अधीक्षक, अतिरिक्त पोलिस महासंचालक व इतर पोलिस अधिकाऱ्यांनी सर्व मार्ग मोकळे करण्यासाठी व वाहतूक सुरळीत करण्यासाठी तातडीने आवश्यक कारवाई करावी, असे निर्देश दिले.
आदेशाचे पालन आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत करण्यात यावे, असेही बजावले. याशिवाय, पोलिस आयुक्तांना उद्या सकाळी ११ वाजेपर्यंत आदेशाच्या अंमलबजावणीचा अहवाल मागितला. दिव्यांग व्यक्ती, ज्येष्ठ नागरिक, महिला व मुले यांना सन्मानपूर्वक बाहेर काढले जावे, असेदेखील न्यायालयाने स्पष्ट केले. या आंदोलनाकरिता २६ ऑक्टोबर रोजी दिलेल्या आदेशाचे उल्लंघन झाल्यामुळे आंदोलकांवर कायद्यानुसार कारवाई करावी, असेसुद्धा न्यायालयाने सांगितले.