बाबा ताजुद्दीन उरूस: नागपूर रेल्वे स्थानकावर कडेकोट बंदोबस्त; सुरक्षा यंत्रणा, प्रशासन सज्ज
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2025 22:37 IST2025-07-19T22:36:13+5:302025-07-19T22:37:09+5:30
नागपूर - मुंबई मार्गावर स्पेशल ट्रेनही धावणार

बाबा ताजुद्दीन उरूस: नागपूर रेल्वे स्थानकावर कडेकोट बंदोबस्त; सुरक्षा यंत्रणा, प्रशासन सज्ज
नरेश डोंगरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: हजरत बाबा ताजुद्दीन औलिया यांच्या वार्षिक उर्सला शुक्रवारपासून नागपुरात सुरुवात झाली आहे. त्यामुळे देशाच्या विविध भागातील हजारो भाविकांची गर्दी रेल्वे स्थानकावर होऊ लागली आहे. त्यांच्या सोयीसाठी आणि सुरक्षेसाठी नागपूर रेल्वे स्थानकावर प्रशासन आणि पोलिस यंत्रणांनी मोठी तयारी केली आहे.
सर्व धर्म समभावाचे प्रतिक म्हणून सर्वत्र ओळखल्या जाणाऱ्या बाबा ताजुद्दीन यांच्या वार्षिक उर्सला शुक्रवारी प्रारंभ झाला. बाबांच्या दर्गाहवर माथा टेकविण्यासाठी देशभरातील भाविकांची नागपूरात वर्दळ वाढली आहे. सर्वाधिक भाविक रेल्वे गाड्यांनी नागपूरात पोहचत आहेत. ते लक्षात घेऊन प्रशासनाने रेल्वे स्थानकावर विविध सोयी-सुविधा निर्माण केल्या आहेत. खास करून स्वच्छता, पिण्याचे पाणी, माहिती कक्ष यांसारख्या सुविधांमध्ये वाढ करण्यात आली आहे. गर्दीचा गैरफायदा घेऊन समाजकंटकांनी उपद्रव करू नये किंवा चोर भामट्यांकडून भाविकांच्या माैल्यवान चिजवस्तू लांबविल्या जाऊ नये, यासाठी रेल्वे पोलीस (जीआरपी) आणि रेल्वे सुरक्षा दलाकडून (आरपीएफ) विशेष खबरदारी घेतली जात आहे. कोणत्याही व्यक्तीचा संशय आल्यास त्याची खातरजमा करून घेतली जात आहे.
सुरक्षा व्यवस्थेची त्रिसूत्री: जीआरपी, आरपीएफ, बीडीडीएस अलर्ट
गर्दीच्या आडून कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून रेल्वे पोलिस (जीआरपी), रेल्वे सुरक्षा दल (आरपीएफ) तसेच श्वानांसह बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाने (बीडीडीएस) चोख बंदोबस्त लावला आहे. जीआरपीचे पोलिस अधीक्षक मंगेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक गाैरव गावंडे यांच्या नेतृत्वात ४ पीएसआयसह १३० कर्मचारी २४ तास रेल्वे स्थानकावर बंदोबस्त करीत आहेत. साध्या वेषातील कर्मचारी गर्दीवर लक्ष ठेवून आहेत.
मध्य रेल्वेकडून तीन स्पेशल ट्रेन
उर्सच्या निमित्ताने नागपुरात दाखल होणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेता मध्य रेल्वेकडून उर्ससाठी ४ स्पेशल ट्रेन सोडण्यात येणार आहेत. मुंबई, भिवंडी, मालेगाव, नाशिककडून गेल्या वर्षी आलेल्या भाविकांची संख्या लक्षात घेत २१ जुलैला मुंबई येथून भाविकांसाठी स्पेशल ट्रेन निघेल. तर, २३ आणि २४ जुलैला दोन स्पेशल ट्रेन नागपूर ते नाशिकसाठी धावणार आहेत.
आधी फक्त नागपूरहून मुंबईकडे जाण्यासाठी स्पेशल ट्रेनची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र, तिकडून येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेऊन अन्य गाड्यांमधील गर्दी वाढू नये म्हणून मुंबईहूनही स्पेशल ट्रेनची व्यवस्था करण्यात आली आहे.
- विनायक गर्ग, विभागीय व्यवस्थापक, मध्य रेल्वे, नागपूर.