नागपुरात ऑटोतील चोरटे सक्रिय; महिलेच्या बॅगमधून २.१० लाखांचे दागिने लंपास
By योगेश पांडे | Updated: September 26, 2023 16:29 IST2023-09-26T16:28:48+5:302023-09-26T16:29:39+5:30
अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल

नागपुरात ऑटोतील चोरटे सक्रिय; महिलेच्या बॅगमधून २.१० लाखांचे दागिने लंपास
नागपूर : ऑटो-बसमधील गर्दीचा फायदा उचलून महिलांच्या पर्समधून रोख किंवा दागिने लांबविणारे चोरटे सक्रिय झाले आहे. इमामवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अशाच प्रकारची घटना घडली व महिलेच्या बॅगमधून चोरट्यांनी २.१० लाखांचे दागिने लंपास केले. काही दिवसांअगोदरदेखील अशा घटना घडल्या आहेत.
अरुणा सुनिल तारगे (५५, दुबे नगर, हुडकेश्वर) या पतीसह गडचिरोलीला गेल्या होत्या. २४ सप्टेंबर रोजी तेथून त्या परत आल्या व गणेशपेठ बसस्थानकातून घरी जाण्यासाठी ऑटोतून निघाले. काही अंतरावर ऑटो बरोबर चालत नसल्याने त्यांच्या पतीने मेडिकल चौकात ऑटो थांबवायला लावला. ऑटोतून उतरले असता अरुणा यांना हॅंडबॅगची चेन उघडी असल्याचे दिसून आले.
बॅग तपासली असता त्यातील दोन लहान पर्स गायब होत्या. पर्समध्ये २.१० लाखांचे दागिने होते. अज्ञात चोरट्याने नजर चुकवून दागिने लंपास केल्याचे लक्षात आले. अरुणा यांनी इमामवाडा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.