अटेंडन्सनी फिरवली रेल्वे कोचकडे पाठ; रेल्वे व्यवस्थापकांकडे गाऱ्हाणे

By नरेश डोंगरे | Published: August 24, 2023 08:48 PM2023-08-24T20:48:55+5:302023-08-24T20:49:16+5:30

नियमित पगार नाही, दैनिक भत्ताही बंद

Attendants turn their backs on train coaches; Complaints to Railway Managers | अटेंडन्सनी फिरवली रेल्वे कोचकडे पाठ; रेल्वे व्यवस्थापकांकडे गाऱ्हाणे

अटेंडन्सनी फिरवली रेल्वे कोचकडे पाठ; रेल्वे व्यवस्थापकांकडे गाऱ्हाणे

googlenewsNext

नागपूर : दिवसरात्र काम करतो. रेल्वेकडून मात्र नियमित पगार मिळत नाही अन् दैनिक भत्ताही बंद करण्यात आला. त्यामुळे आम्ही जगायचे कसे, असा प्रश्न रेल्वेतील कोच अटेंडन्सनी आज अधिकाऱ्यांना केला. मुस्कुटदाबी होत असल्याच्या भावनेमुळे गेल्या काही दिवसांपासून रेल्वेच्या कोच अटेंडन्सनी काम बंद केले. त्यामुळे त्यांच्यावरील दबाव वाढला आहे. या पार्श्वभूमीवर, आज ही मंडळी रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापक कार्यालयात आली आणि त्यांनी अधिकाऱ्यांसमोर आपले गाऱ्हाणे मांडले.

नागपूर मुंबई दुरंतो एक्सप्रेस, सेवाग्राम एक्सप्रेस, अमृतसर एक्सप्रेस, गरिबरथ एक्सप्रेस, जयपूर एक्सप्रेस या गाड्यांच्या एसी कोच मध्ये दिल्लीच्या एका कंपनीने कोच अटेंडन्सन नियुक्त केले आहेत. या कंपनीने त्यांची जबाबदारी भुसावळच्या एका व्यक्तीकडे सोपवली आहे. त्याने जितेंद्र चंदेल आणि पूरण सिंह नामक व्यक्तींना व्यवस्थापक म्हणून नागपुरात नेमले आहे. त्यांच्या निर्देशानुसार १०० पेक्षा जास्त कोच अटेंडन्स रेल्वे गाड्यांमध्ये काम करतात. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना नियमित पगार दिला जात नाही.

पगाराच्या नावाखाली मिळणाऱ्या १२ हजार रुपयांतून उशी, ब्लांकेट किंवा चादर कमी आढळल्यास त्यांचे पैसे कापले जातात. आधी प्रवास भत्ता दिला जायचा. आता तोसुद्धा बंद करण्यात आला आहे. त्यामुळे आम्ही घर कसे चालवायचे, जगायचे कसे,असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. या स्थितीमुळेच आम्ही काम बंद आंदोलन करीत असल्याचे त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. कोणतीही कपात न करता पूर्ण पगार द्यावा आणि प्रवास भत्ता देण्यात यावा. जोपर्यंत हे मिळणार नाही, तोपर्यंत आम्ही कामावर परतणार नाही, असेही ते म्हणाले.

... म्हणून पगार देण्यास अडचण
या संबंधाने व्यवस्थापक जितेंद्र चंदेल यांनी बाजू मांडताना रेल्वेकडून वेळेवर आमची बिलं मिळत नसल्याने पगार देण्यास अडचण होत असल्याचे म्हटले. आर्थिक कोंडीमुळे प्रवास भत्ता बंद करण्यात आला असून चादर, ब्लँकेट, उशा गायब होत असल्यामुळे कंपनीला दर महिन्याला १६ ते १७ लाख रुपये पेनॉल्टी द्यावी लागते. मात्र, जुलैपर्यंतचा हिशेब करून सर्व कोच अटेंडन्सना शुक्रवारी २५ ऑगस्टला पगार देण्यात येईल, असेही चंदेल यांनी सांगितले.

Web Title: Attendants turn their backs on train coaches; Complaints to Railway Managers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :railwayरेल्वे