नागपुरात जन्मदात्रीच्या खुनाचा प्रयत्न : टोकदार वस्तूने केले घाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2018 21:30 IST2018-10-20T21:26:52+5:302018-10-20T21:30:21+5:30
घर नावावर करून घेण्यासाठी स्वत:च्या जन्मदात्रीचा जीव घेण्याचा एका आरोपीने प्रयत्न केला. तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी सायंकाळी ५ च्या सुमारास ही घटना घडली.

नागपुरात जन्मदात्रीच्या खुनाचा प्रयत्न : टोकदार वस्तूने केले घाव
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : घर नावावर करून घेण्यासाठी स्वत:च्या जन्मदात्रीचा जीव घेण्याचा एका आरोपीने प्रयत्न केला. तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी सायंकाळी ५ च्या सुमारास ही घटना घडली. दीपक केशव रंभाड (वय २५) असे आरोपीचे नाव असून, पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
मुलाच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या आईचे नाव लीलावती केशव रंभाड (वय ४६) आहे. त्या तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत पुणेकरच्या घराजवळ राहतात. आरोपी दीपक रंभाड नंदनवनमधील व्यंकटेशनगरात राहतो. आई लीलावती ज्या घरात राहतात, ते घर आपल्या नावावर करून देण्यासाठी आरोपी दीपकने तिच्यामागे अनेक दिवसांपासून तगादा लावला आहे. त्याची वृत्ती बघता तो उद्याच घराबाहेर काढेल, अशी भीती वाटत असल्याने लीलावती त्याला टाळत होत्या. या पार्श्वभूमीवर, शुक्रवारी सायंकाळी ४.३० च्या सुमारास दीपक लीलावती यांच्या घरी आला. त्याने पुन्हा घर नावावर करून देण्याचा विषय काढून लीलावतीसोबत वाद सुरू केला. एवढेच नव्हे त्याने अश्लील शिवीगाळ करून लीलावती यांच्यावर टोकदार टोच्याचे घाव घातले. यामुळे त्या गंभीर जखमी झाल्या. आरडाओरड ऐकून शेजारी धावले तेव्हा आरोपीने त्यांना सोडले. दरम्यान, गंभीर जखमी अवस्थेत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांनी दिलेल्या माहितीवरून तहसील पोलिसांनी आरोपी दीपकविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. पुढील तपास सुरू आहे.