राजीवनगर येथे युवकाच्या हत्येचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:09 IST2021-05-14T04:09:06+5:302021-05-14T04:09:06+5:30

हिंगणा : एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राजीवनगर येथे एका ३३ वर्षीय युवकाची गळा चिरून हत्या करण्याचा प्रयत्न करण्यात आला. ...

Attempted murder of a youth at Rajivnagar | राजीवनगर येथे युवकाच्या हत्येचा प्रयत्न

राजीवनगर येथे युवकाच्या हत्येचा प्रयत्न

हिंगणा : एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राजीवनगर येथे एका ३३ वर्षीय युवकाची गळा चिरून हत्या करण्याचा प्रयत्न करण्यात आला. बुधवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. सम्राट विजय सिंग (३३) रा. राजीवनगर असे जखमीचे नाव आहे. त्याच्यावर डिगडोह येथील लता मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सम्राटचे वडील विजय सिंग यांनी गुरुवारी सकाळी या घटनेची माहिती एमआयडीसी पोलिसांना दिली. त्यांच्यानुसार सम्राट याने त्याचा मित्र प्रदीप ऊर्फ बच्चन सिंग याला बुधवारी रात्री घरी आणले होते. रात्री उशिरापर्यंत दोघेही घरातील मागच्या खोलीत दारू पीत बसले होते. वडील विजय यांनी त्यांना जेवण बनवून दिले. यानंतर ते झोपी गेले. गुरुवारी सकाळी ६.३० वाजता वडील सम्राटच्या खोलीत गेले तेव्हा तो रक्ताच्या थारोळ्यात पडून होता. त्यांनी याबाबत एमआयडीसी पोलिसांना सूचना दिली. दरम्यान, जखमी सम्राटला उपचारासाठी लता मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले. एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध भादंवि कलम ३०७ नुसार गुन्हा दाखल केला आहे. एकंदरीत हा सर्व प्रकार संशयास्पद असून, पोलीस रात्री त्याच्याबरोबर दारू पीत असलेल्या मित्र प्रदीपचा शोध घेत आहेत. याप्रकरणी सम्राटचे बयान नोंदविल्यानंतर पोलीस तपासाला गती येण्याची शक्यता आहे.

Web Title: Attempted murder of a youth at Rajivnagar