दिवसाढवळ्या मोलकरणीवर बलात्काराचा प्रयत्न, दोघांना अटक

By दयानंद पाईकराव | Updated: April 10, 2024 21:36 IST2024-04-10T21:35:48+5:302024-04-10T21:36:50+5:30

महिलेने प्रतिकार करुन केली सुटका, तोंड दाबून नेत होते झुडुपात

Attempt to rape a maid in broad daylight, two arrested | दिवसाढवळ्या मोलकरणीवर बलात्काराचा प्रयत्न, दोघांना अटक

दिवसाढवळ्या मोलकरणीवर बलात्काराचा प्रयत्न, दोघांना अटक

नागपूर: खुनांच्या मालिकेने उपराजधानी हादरलेली असताना बुधवारी एका महिलेचे तोंड दाबून तिला झुडुपात नेऊन तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न करण्यात आला. सोनेगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी सकाळी १०.१५ वाजताच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली असून महिलेने प्रतिकार करून आरोपींच्या तावडीतून सुटका करून घेतल्यामुळे अनर्थ टळला. या प्रकरणी सोनेगाव पोलिसांनी दोन्ही आरोपींना गजाआड केले आहे.

कुबेरसिंग बागेशरण (३०) आणि सुनिलकुमार रुपशाह (३०) दोघे. रा. अमवार ता. दुद्धी, जि. सोनभद्र उत्तरप्रदेश अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपी मागील सात वर्षांपासून शहरात मजुरीचे काम करतात. सोनेगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणारी ३५ वर्षीय महिला घरकाम करते. तिच्या पतीचा २०१२ मध्ये अपघातात मृत्यू झाला आहे. तिला दोन मुले आहेत. पतीच्या मृत्यूनंतर ती आईवडिल आणि भावाकडे राहते. घरकाम करून ती आपली उपजिविका आणि मुलांचे पालनपोषण करते. बुधवारी सकाळी १०.१५ वाजता ती मिहान फर्स्ट सिटीत घर कामासाठी जात होती. रोजच्या पायवाटेने फोनवर काकुसोबत बोलत जात असताना पायवाटेत असलेल्या निर्जनस्थळी आरोपी कुबेरसिंग आणि सुनिलकुमार यांनी मागून येऊन महिलेचे तोंड दाबले.

आरोपी तिला झुडुपात उचलून नेत होते. परंतु महिलेने आरडाओरड करून जोरात प्रतिकार करीत आपली सुटका करून घेतली. त्यानंतर महिलेने आरोपींच्या तावडीतून पळून जात जवळच असलेले अपार्टमेंट गाठले. तेथील सुरक्षा रक्षकाला तिने आपबिती सांगितली. तसेच भावाला, तेथे जमलेल्या नागरिकांना व पोलिसांना घडलेल्या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी परिसरात शोध घेऊन दोन्ही आरोपींना गजाआड केले. या प्रकरणी महिलेने दिलेल्या तक्रारीवरून सोनेगाव ठाण्याचे उपनिरीक्षक किशोर चुटे यांनी आरोपींविरुद्ध कलम ३४१, ३५४, ३४ नुसार गुन्हा दाखल करून तपास सुरु केला आहे.

Web Title: Attempt to rape a maid in broad daylight, two arrested